स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू दाती महाराजविरोधात दिल्ली हायकोर्टाच्या आदेशानंतर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. पीडित तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार आणि बलात्कार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू दाती महाराजवर जून महिन्यात एका शिष्येने बलात्काराचा आरोप केला होता. दिल्लीतील फतेहपूर बेरीमधील शनिधाम मंदिरालगत दाती महाराजचा आश्रम आहे, पीडित तरुणी २५ वर्षांची असून ती गेल्या १० वर्षांपासून आश्रमात त्यांची अनुयायी होती. मात्र दाती महाराजने आश्रमात आपल्यावर बलात्कार केला आणि याची वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली असे पीडित तरुणीने म्हटले होते. पीडित तरुणी मूळची राजस्थानची आहे.

२२ जून रोजी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी दाती महाराजची चौकशी देखील केली होती. यानंतर दाती महाराजविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आली होती. मात्र, दिल्ली पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करत पीडितेने थेट हायकोर्टात याचिका दाखल केली. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची विनंती तिने हायकोर्टाला केली होती. हायकोर्टानेही तिची विनंती मंजूर करत या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, असे आदेश दिले होते.

हायकोर्टाच्या आदेशानंतर अखेर शुकवारी सीबीआयने दाती महाराजविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अनैसर्गिक अत्याचार, बलात्कार, डांबून ठेवणे अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  दरम्यान, दाती महाराजच्या आश्रमातून जवळपास ६०० मुली बेपत्ता झाल्याचा आरोपही झाला होता. त्यामुळे दाती महाराजला अटक झाल्यास या सर्व प्रकरणांचे गूढ उकलण्याची शक्यता आहे.