मृतांचा आकडा ४२ वर, ६३० संशयितांना अटक

नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीत शुक्रवारी पोलिसांनी शांतता प्रस्थापित केली असली तरी तणाव कायम आहे. दंगलीतील मृतांची संख्या ४२ झाली आहे. आत्तापर्यंत दंगलखोरांविरोधात १२३ गुन्हे दाखल करण्यात आले असून ६३० संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी मनदीप रंधावा यांनी पत्रकारांना दिली.

दोन विशेष तपास पथके स्थापन करण्यात आली असून सखोल चौकशी करून दोषींविरोधात गुन्हे दाखल केले जातील. केंद्रीय गृह मंत्रालयाने दिल्ली पोलीस आयुक्त अमूल्य पटनायक यांची उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी तीन दिवसांपूर्वी विशेष आयुक्तपदी (कायदा-सुव्यवस्था) नियुक्त करण्यात आलेले एस. एन. श्रीवास्तव यांच्याकडे पोलीस आयुक्त पदाची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. ‘आयबी’चे कर्मचारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ‘आप’चे नगरसेवक ताहीर हुसेन यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शर्मा यांचा मृतदेह नाल्यात आढळला होता. या मृत्यूच्या चौकशीसाठी फोरेन्सिक तज्ज्ञांचा गट तयार करण्यात आला आहे.

दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दंगलीत घर भस्मसात झालेल्या कुटुंबांना २५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली असून पुढील दोन दिवसांत पैसे थेट बँक खात्यात जमा केले जातील वा धनादेश दिला जाणार आहे. दंगलग्रस्त भागांमध्ये मदत व पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात आल्याची माहिती केजरीवाल यांनी पत्रकारांना दिली. ज्या जखमींना सरकारी रुग्णालयात दाखल केले गेले नाही त्यांना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले जात आहे. हिंसाचारात अनेकांची घरे, दुकाने जळून खाक झाली असून अन्नधान्यांची मोठय़ा प्रमाणावर कमतरता आहे. त्यासाठी दिल्ली सरकारने यंत्रणा कार्यान्वित केली असून लोकांना अन्नधान्य आणि पाण्याची व्यवस्था केली जात असल्याचेही केजरीवाल यांनी सांगितले. अनेक लोक बेघर झाले असून त्यांच्या निवाऱ्याची ताप्तुरती सोय उपलब्ध करून दिली जात आहे.

नायब राज्यपालांची भेट

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यानंतर दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी शुक्रवारी दंगलग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक रहिवाशांच्या व्यथाही त्यांनी ऐकून घेतल्या. चार दिवसांच्या हिंसाचारानंतर शुक्रवारी दंगलग्रस्त भागांमध्ये अनुचित प्रकार झाला नाही. पोलिसांचा कडक बंदोबस्त ठिकठिकाणी होता. दुपारी १२ ते ४ या वेळेत जमाव बंदी मागे घेण्यात आल्यामुळे रस्त्यांवर रहदारी दिसत होती. काही दुकाने उघडलेली असल्याने दैनंदिन व्यवहार काही प्रमाणात सुरू झालेले दिसत होते.