कोलकाता : एखादे मतदान केंद्र ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथे मतदार म्हणून नावनोंदणी असलेल्यांनाच त्या बूथवर मतदान एजंट म्हणून नेमण्याचा राजकीय पक्षांना आदेश देणारा नियम पुन्हा लागू करावा, अशी मागणी खासदार सुदीप बंदोपाध्याय यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसच्या एका शिष्टमंडळाने शनिवारी निवडणूक आयोगाला केली.

गेल्या आठवड्यात हा नियम शिथिल करून विधानसभा मतदारसंघाच्या कुठल्याही भागातून एजंट नियुक्त करण्याची मुभा देण्यात आली होती. पूर्वीच्या नियमाप्रमाणे, मतदान केंद्र ज्या विधानसभा मतदारसंघात आहे, तेथे राहणाऱ्या स्थानिकांनाच राजकीय पक्षांनी मतदान एजंट म्हणून नेमायला हवे, असे बंदोपाध्याय यांनी मुख्य निवडणूक अधिकारी आरिझ आफताब यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले.

‘भाजपने निवेदने दिल्यानंतर, राजकीय पक्षांनी त्याच वस्तीतील निवडणूक एजंट नेमण्याची बऱ्याच काळापासूनची प्रथा निवडणूक आयोगाने बदलली आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात अनेक एजंट एकमेकांना ओळखतही नसल्याने अनेक समस्या उद््भवल्या आहेत,’ असे बंदोपाध्याय म्हणाले.