केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे प्रतिपादन

वॉशिंग्टन : जम्मू-काश्मीरमध्ये अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारच्या धोरणाचा तपशील लवकरच उपलब्ध केला जाईल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे सांगितले.

पर्यटन, हस्तकला, रेशीम, केशर आणि सफरचंद उत्पादन अशा संभाव्य क्षेत्रांचा या वेळी अर्थमंत्र्यांनी उल्लेख केला. नव्या धोरणाचा तपशील लवकरच उपलब्ध होईल, असे त्या म्हणाल्या.

जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले होते की, सरकारी आणि खासगी कंपन्यांना या क्षेत्रातील युवकांसाठी रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत प्रोत्साहन दिले जाईल. त्यामुळे या सर्व बाबींचा सारासार विचार करून त्यांचा अंतर्भाव धोरणात करण्याचा विचार आहे, असेही त्या म्हणाल्या. केंद्रीय गृहमंत्रालय व अर्थमंत्रालय यावर काम करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.

‘हवामान बदलाबाबत भारताची बांधिलकी’

हवामान बदलाच्या जागतिक आव्हानाचा मुकाबला करण्याबाबत भारताची बांधिलकी धाडसी असून ती अनेक देशांच्या समुदायामध्ये सर्वोत्तम आहे, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी येथे स्पष्ट केले.

हवामान बदलाच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठीची बांधिलकी जपताना भारताने नवीनीकरणीय ऊर्जा निर्मितीवर भर दिला आहे, असेही सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) मुख्यालयात जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांशी चर्चा करताना सांगितले.

अनेक देशांनी चर्चा करून पॅरिस करार केला त्यामध्ये भारताने चार आश्वासने दिली त्यामध्ये हरितगृह वायू उत्सर्जनाची तीव्रता कमी करण्याचाही समावेश आहे, असेही अर्थमंत्री म्हणाल्या. दिलेल्या आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आम्ही खरोखरच नवीनीकरणीय ऊर्जानिर्मितीवर भर दिला आहे, असेही त्या म्हणाल्या.