केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांचे मत

पॅरिस हवामान करार हा ऐतिहासिक व कायदेशीर बंधनकारक असून त्यात तापमान औद्योगिक क्रांतीच्या तापमानावेळच्या तापमानापेक्षा २ अंश सेल्सियसने खाली ठेवण्याचे मान्य करण्यात आले आहे. विकसित देशांनी जास्त ऐतिहासिक जबाबदारी स्वीकारली असती तर हा करार अधिक महत्त्वाकांक्षी व प्रभावी करता आला असता असे मत पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले आहे.
या कराराने विकासाचा हक्क मिळाला आहे व पर्यावरण रक्षणासह विकास साधण्याचा हेतू ठेवतानाच तापमानवाढीचा फटका ज्यांना बसणार आहे त्यांना यात थोडा दिलासा मिळणार आहे. आजचा दिवस ऐतिहासिक आहे. तो एक करार नाही तर सात अब्ज लोकांना वाचवण्यासाठीच्या आशेचा नवा अध्याय आहे. आपल्याला पूर्वजांकडून पृथ्वी ही वारशाने मिळालेली नाही पण ती भावी पिढय़ांकडून कर्जाऊ मिळालेली आहे, असे गांधीजी म्हणत असत. हा महत्त्वाकांक्षी करार करणे सोपे नव्हते कारण सहमती अवघड असते. आता आपण हवामान बदलाचे आव्हान स्वीकारून भावी पिढय़ांचे भवितव्य चांगले घडवणार आहोत, असे सांगून ते म्हणाले की, विकसित देशांनी पुरेशी जबाबदारी उचलली नाही. त्यांनी कार्बन उत्सर्जन कमी करण्यात मोठा वाटा उचलणे अपेक्षित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन झाली हे या परिषदेचे वैशिष्टय़ होते त्यामुळे सौर ऊर्जेला प्रोत्साहन मिळणार आहे. सामान्यांच्या भावना प्रतिबिंबित करणाऱ्या या कराराला मान्यता मिळाली, शाश्वत जीवनशैली, वस्तूंची शाश्वत उपभोग्यता यावर भर देण्यात आला. विकसित व विकनशील देशांनी उचलण्याच्या जबाबदारीत फरक करण्यात आला आहे ही चांगली बाब आहे.