कोविड १९ वर सध्या रेमडेसीवीर, हायड्रॉक्सीक्लोरोक्विन, डेक्सॅमिथेसोन यासारखी अनेक औषधे वापरली जात असली तरी त्यांच्या परिणामकारकतेबाबत मतभेद आहेत. त्यामुळे ब्रिटिश संशोधकांनी अलीकडेच यावर सर्वागीण अभ्यास केला असता त्यातील डेक्सॅमिथेसोन हे औषध कोविड १९ ची लागण झाल्यानंतर  लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जास्त उपयोगी असल्याचे दिसून आले आहे.

कमी लक्षणे असलेल्या रुग्णात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध उपयोगी ठरत असल्याचे इतर दोन अभ्यासात दिसून आले आहे. डॉ अँथनी फॉसी, डॉ. एच. क्लिफोर्ड लेन यांनी दी न्यू इंग्लंड मेडिकल जर्नलमध्ये याबाबत लेख लिहिला असून त्यांच्या मते कोविड १९ साथीवर विश्वासार्ह उपचार शोधण्यासाठी संशोधनाची प्रक्रिया गरजेची आहे.

ऑक्सफर्ड विद्यापीठात या स्टेरॉइड प्रकारातील डेक्सॅमिथेसोन औषधावर प्रयोग केले असता त्यामुळे वेदना व दाह कमी झाल्याचे दिसून आले. २१०४ रुग्णांना ते देण्यात आले. इतर ४२३१ रुग्णांना नेहमीचे उपचार दिले. त्यात ज्यांना व्हेन्टिलेटरची गरज होती अशा ३६ टक्के  लोकांचे प्राण वाचले. या औषधाचा वापर केलेल्यांत मृत्यूचे प्रमाण २९ टक्के ,तर वापर न केलेल्यात ४१ टक्के होते.ऑक्सिजनवरील रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण २३ टक्क्य़ांनी कमी झाले. हे औषध घेणाऱ्यातील २३ टक्के जणांचा मृत्यू झाला व इतर उपचार घेणाऱ्यातील मृत्यूचे प्रमाण २६ टक्के होते. पण हे औषध रोगाच्या प्राथमिक अवस्थेत हानिकारक ठरते. त्यात या औषधाचा वापर केलेल्या १८ टक्के लोकांचा मृत्यू झाला. इतर उपचार घेणाऱ्यातील १४ टक्के जणांचा मृत्यू झाला, असा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.

‘हायड्रॉक्सिक्लोरोक्विन उपयोगाचे नाही’

ऑक्सफर्ड विद्यापीठाने या औषधाचा अभ्यास केला असून त्यांच्या मते हे औषध दिलेले २५.७ टक्के रुग्ण मरण पावले, तर इतर उपचार घेणारे २३.५ टक्के रुग्ण मरण पावले. २८ दिवसात हा परिणाम दिसून आला. आता मृत्यूच्या टक्केवारीतील फरक यात खूप कमी आहे. २८ दिवसांच्या काळात हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेणाऱ्यात ६० टक्के जणांचा मृत्यू झाला, तर इतर औषधे घेणाऱ्या ६३ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. व्हेंटिलेटरवरील रुग्णातही त्याचा फारसा उपयोग दिसून आला नाही. स्पेनमध्ये २९३ लोकांवर या औषधाचा प्रयोग झाला त्याचे निष्कर्ष क्लिनिकल इनफेक्शियस डिसीज या नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहेत. त्यानुसार या औषधाच्या वापराने गंभीर रुग्णात फारसा फायदा झाला नाही. मिनेसोटा विद्यापीठातील संशोधनानुसार कमी लक्षणे असलेल्या ४२३ रुग्णात या औषधाने फारसा फायदा झाला नाही. त्यामुळे या औषधाचा वापर करण्यात अर्थ नाही, असे न्यूयॉर्क मेडिकल कॉलेजचे डॉ. नील शुलगर यांनी म्हटले आहे.

रेमडेसीवीर तुलनेत चांगले

रेमडेसीवीर औषधाचे कोविड १९ रुग्णातील परिणाम चांगले आहेत, त्यामुळे रुग्णालयात दाखल होणे चार दिवस तरी लांबू शकते. या औषधाचा वापर डेक्सॅमिथेसोन समवेत करण्याचे प्रयोग व्हावेत, असे मेमोरियल स्लोन केटरिंग संस्थेचे डॉ. बाख यांचे म्हणणे आहे. या औषधाच्या निर्मात्या गिलिड सायन्सेस कंपनीने आतापर्यंत हे औषध इंजेक्शन रूपात आणले असले तरी आता श्वासातून देण्याची त्याची आवृत्ती तयार करण्यात येणार आहे. मुलांवरही या औषधाचे प्रयोग चालू आहेत.