चीनकडून भारतीय हद्दीत सातत्याने होत असलेल्या घुसखोरीचा बंदोबस्त करण्यास आम्ही समर्थ असून या प्रकरणी आम्हाला अमेरिकेकडून कोणत्याही मदतीची अपेक्षा नाही, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी मंगळवारी येथे केली. सहा दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या मेनन यांनी मंगळवारी पत्रकारांशी संवाद साधला. या दौऱ्यात त्यांनी अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार सुसान राइस, संरक्षण सचिव चक हेगल आदींची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
चीनने १९६२मध्ये भारतावर आक्रमण केले. त्यावेळी भारताने अमेरिकेच्या मदतीची इच्छा व्यक्त केली होती, असे सीआयए या अमेरिकी गुप्तहेर संघटनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे. हा धागा पकडत ‘चीनकडून सध्या सातत्याने भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याने तुम्हाला आताही अमेरिकेची मदत अपेक्षित आहे का आणि त्यासाठी तुम्ही हा दौरा आयोजित केला होता का’, असा प्रश्न मेनन यांना विचारण्यात आला. या प्रश्नामुळे मेनन काहीसे संतप्त झाले. तुमच्या प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. तुम्ही १९६२चा संदर्भ आता कसा देऊ शकता, तेव्हाच्या आणि आताच्या भारतात जमीन-अस्मानाचा फरक आहे. भारत हा स्वतंत्र आणि सार्वभौम देश आहे. सीमेवरील तणाव निपटण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आम्हाला मदत करा, अशी अन्य देशांना याचना करण्याचे दिवस आता राहिले नाहीत, अशा शब्दांत त्यांनी संबंधित पत्रकाराला फटकारले. खरे तर असा प्रश्न विचारताच कामा नये, असेही त्यांनी सुनावले.
काश्मीरबाबतही तेच..
केवळ चीनच नाही तर पाकिस्तानच्या घुसखोरीबाबतही आमचे तेच धोरण आहे. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्त्रसंधीच्या भंगाप्रकरणीही आम्ही भूमिका घेण्यास समर्थ आहोत. अमेरिकेचे धोरणही या बाबतीत स्पष्ट असून कोणत्याही दोन देशांच्या वादग्रस्त प्रश्नांमध्ये पडण्याची त्यांची इच्छा नाही, असे मेनन यांनी सांगितले.