महिन्याभर सुरु असणाऱ्या राजकीय गोंधळानंतर अखेर २८ नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित सरकार स्थापन केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी पहिल्यांदाच जाहीर मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी राज्यातील सत्तापेच सुरु असताना केंद्रातील भाजपा सरकराने पर्यायाने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती का यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यामधील विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या पारड्यात जनमताचा कौल पडल्यानंतर मुख्यमंत्रीपदावरुन वाद झाला आणि शिवसेना भाजपाची युती तुटली. त्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसला सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केले. मात्र महाराष्ट्रासारखे राज्य हातातून जाऊ नये म्हणून दिल्लीमधून राष्ट्रवादीला सोबत घेऊन बहुमताचा आकडा गाठण्याचे प्रयत्न सुरु असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. याच बातम्यांमध्ये भाजपाने राष्ट्रवादीसमोर नवा फॉर्म्यूला मांडल्याचेही वृत्त होते. या वृत्तानुसार जुलै २०२२ मध्ये शरद पवारांना राष्ट्रपतीपद आणि राज्यातील सत्तेत मोठा वाटा देण्याचं आश्वासन भाजपाकडून राष्ट्रवादीला देण्यात आल्याचे म्हटलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटीदरम्यान याबद्दल चर्चा झाल्याची राजकीय वर्तुळात खुसपूस सुरु होती. त्यामुळेच शरद पवार भाजपाबरोबर जाणार की शिवसेनेला साथ देणार यावरुन जाणकारांमध्येच दोन गटही पडले होते. त्यातच शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांनी रातोरात भाजपाला पाठिंबा जाहीर केला. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र भाजपाला देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर पुन्हा एकदा हे सारं दिल्लीतील पवार आणि मोदींच्या बैठकीत ठरल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र अजित पवारांचा निर्णय पक्षाचा निर्णय नसल्याचे पवारांनी लगेच स्पष्ट करत यासंदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषदही घेतली. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी याचिका दाखल केली. तीन दिवसांनंतर न्यायालयाने बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. त्यानंतर लगेचच अजित पवार आणि फडणवीस यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि अजित पवारांच्या मदतीने स्थापन झालेले देवेंद्र सरकार चार दिवसात कोसळले. याच दरम्यान अनेकदा राष्ट्रवादीच्या आणि पवारांच्या भूमिकेवर आणि पवारांना मिळालेल्या राष्ट्रपतीपदाच्या ऑफरवर चर्चा झाली.

याच राष्ट्रपतीपदाच्या ऑफर संदर्भात पवारांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारण्यात आला. “पंतप्रधान नरेंद्र मोदीं तुम्हाला राष्ट्रपतीपदाची ऑफर दिल्याची चर्चा होती. त्याबद्दल काय सांगाल,” या प्रश्नाला पवारांनी उत्तर दिले. “अशा पद्धतीची कोणतीही ऑफर मला देण्यात आली नव्हती,” असं पवारांनी स्पष्ट केलं. “अवकाळी पावासामुळे राज्यात झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी व केंद्र सरकारने महाराष्ट्राला यासाठी मदत करायली हवी, हे सांगण्यासाठी आपण पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती” असं पवारांनी मुलाखतीमध्ये स्पष्ट केलं.

या भेटीत काय झालं

मोदींबरोबरच्या भेटीमध्ये शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे कसा फटका बसला आहे याचीच चर्चा झाल्याचे पवारांनी सांगितले. “अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान आणि राज्याला केंद्र सरकारने मदत करावी या मागण्या मांडण्यासाठी पंतप्रधान मोदी यांना भेटण्यास जाण्यासाठी मी वेळ मागितली होती. नेमकी राज्यातील सत्तास्थापनेच्या घडामोडींदरम्यान वेळ देण्यात आली. कदाचित यामुळे आमच्यात गैरसमज वाढायला मदत होईल, अशी पंतप्रधान कार्यालयाची इच्छा असावी. त्यांनी दिलेल्या वेळेनुसार मी त्यांना भेटायला गेलो होतो. मला काही चिंता नव्हती कारण, मी संपूर्ण विदर्भाचा दौरा करून आलेलो होतो. अवकाळी पावसामुळे संबंध महाराष्ट्रात झालेल्या नुकसानीची माहिती देवून, अशा संकटाच्या काळात केंद्र सरकारने मदत करावी, हे त्यांना सांगायचे होते. त्यानुसार यासंदर्भात आमचं बोलणं झालं,” अशी माहिती पवारांनी दिली.

निघता निघता मोदींनी दिली ऑफर

या भेटीमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरील चर्चा संपवून आपण निघण्याच्या तयारीत असताना मोदींनी मला एक ऑफर दिल्याचे पवारांनी मुलाखतीमध्ये सांगितले. “पंतप्रधानांबरोबर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मी निघण्याच्या तयारीत असतानाच पंतप्रधानांनी मला थांबवलं आणि म्हणाले की, आपण एकत्र येऊन काम केल्यास मला आनंद होईल. यावर मी त्यांना आपले व्यक्तीगत संबंध उत्तम आहेत, ते राहतील. परंतु आपण एकत्र काम करणं मला राजकीयदृष्ट्या शक्य नाही”, असं उत्तर दिल्याचं पवारांनी स्पष्ट केलं.