काँग्रेसचे नेते व उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांचा मुलगा आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांचा एक फोटो शेअर करत दिग्विजय सिंह यांनी टीका केली आहे. “राष्ट्रीय स्वयंसेवक संघात शिक्षा दिक्षा वेगळ्या लोकांच्या मुलांसाठी वेगळी असते,” असं दिग्विजय यांनी म्हटलं आहे.

सध्या आयपीएल सुरू असल्यानं बीसीसीआयचे सचिव जय शाह हे यूएईमध्ये आहेत. जय शाह यांचा एक फोटो ट्विट करत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी संघ व भाजपावर टीका केली आहे. “अमित शाह यांचे सुपूत्र जयेश शाह हे दुबईत मॅचमध्ये आहेत. आयपीएल यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आरएसएसची शिक्षा दिक्षा वेगवेगळ्या लोकांच्या मुलांसाठी वेगवेगळी असते. भाजपा नेत्यांच्या मुलांना सूट, बूट आणि विदेशात आणि सर्वसामान्य जनतेच्या मुलांना तलवार, लाठी व पिस्तुल देऊन द्वेष व हिंसेची,” असं म्हणत दिग्विजय सिंह यांनी भाजपा व संघावर टीका केली आहे.

दिग्विजय सिंह यांनी ट्विट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. या फोटोमध्ये जय शाह हे यूएईमध्ये सुरू असलेल्या मॅच पाहताना दिसत आहेत. त्यांच्या बाजूला अरबी लोकही आहेत. तर दुसऱ्या फोटोमध्ये संघ गणवेशातील छोटी मुलं दाखवण्यात आली असून, त्यांच्या हाती काठ्या व शस्त्र दाखवण्यात आली आहेत.