भाजपा खासदार मनोहर उंटवाल यांनी नर्मदा यात्रा करणाऱ्या काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्यावर टीका करताना वादग्रस्त विधान केले आहे. दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नाही. ते फक्त दिल्लीतून आयटम घेऊन आले, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले आहे. या विधानावरुन टीका होताच उंटवाल यांनी सारवासारव करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे नर्मदा यात्रेत सहभागी झाले होते. नर्मदा यात्रेत मध्य प्रदेश सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे गोळा केले आहेत. लवकरच हे पुरावे जनतेसमोर आणू, असे दिग्विजय सिंह यांनी म्हटले होते. दिग्विजय सिंह यांची ३ हजार किलोमीटरची नर्मदा यात्रा ९ एप्रिल रोजी संपली. नरसिंहपूर जिल्ह्यात ही यात्रा संपली. ७० वर्षीय दिग्विजय सिंह आणि त्यांची पत्नी अमृता यांनी ही यात्रा केली होती. मध्य प्रदेशमधील शिवराज सरकारकडून ५ साधूंना राज्यमंत्रिपदाचा दर्जा देण्याच्या निर्णयावरही दिग्विजय सिंह यांनी टीका केली होती.

दिग्विजय सिंह यांच्या टीकेचा भाजपा खासदार मनोहर उंटवाल यांनी एका कार्यक्रमात समाचार घेतला. मात्र, टीका करताना त्यांची जीभ घसरली. ‘दिग्विजय सिंह यांनी मध्य प्रदेशसाठी काहीच केले नाही. ते दिल्लीतून एक आयटम घेऊन आले आणि नर्मदा यात्रेवरही निघून गेले. आता त्यांना साधूसंताना लाल दिवा देण्यावर आक्षेप आहे, असे बेताल विधान त्यांनी केले.

उंटवाल यांच्या विधानावरुन टीका सुरु होताच ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सारवासारव केली. मी दिग्विजय सिंह यांचा आदर करतो. मी महिलांचाही आदर करतो. माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी त्यांच्या पत्नीबाबत बोलत नव्हतो, असे त्यांनी सांगितले.