देवयानी खोब्रागडेंची संयुक्त राष्ट्रात बदली केल्यामुळे त्यांना आता भक्कम राजनैतिक संरक्षण मिलणार असले तरी याचा लाभ त्यांना तात्पुरता मिळेल आणि व्हिसा घोटाळाप्रकरणी त्यांना कधी ना कधी अटकेला सामोरे जावेच लागेल असे अमेरिकी अधिका-यांनी बजावले आहे. भारत-अमेरिका संबंध सध्या ताणलेल्या अवस्थेत असून दोन्ही देशांनी ताठर भूमिका घेतल्या आहेत. भारताने खोब्रागडेंवरील सर्व आरोप मागे घ्यावेत तसेच बिनशर्त माफी मागावी अशी मागणी केली आहे. तर अमेरिकेने माफी मागण्याचा प्रश्नच येत नसल्याचे सांगितले आहे. भारताने अमेरिकेच्या देशात असलेल्या रादनैतिक अधिका-यांचे संरक्षण काढून घेतले असून त्यांना ओळखपत्रेही जमा करण्यास सांगितले आहे.
जोपर्यंत एखादी व्यक्ती राजनैतिक संरक्षणाच्या कवचात आहे तोपर्यंत तिला अटक होणार नाही, मात्र याचा अर्थ त्या व्यक्तिवरील आरोप रद्द होत नाहीत. असे सांगत अमेरिकेच्या अधिका-यांनी ज्यावेळी त्यांचे राजनैतिक संरक्षण संपुष्टात येईल, त्यावेळी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. थोडक्यात म्हणजे सध्या जरी देवयानी खोब्रागडे यांची अटक टळली असली तरी ज्यावेळी त्यांची संयुक्त राष्ट्रातली कारकिर्द संपेल त्यावेळी त्यांना पुन्हा अटकेला व खटल्याला सामोरे जावे लागेल अशी शक्यता आहे.
अमेरिकी अधिकारी जेन पास्की यांनी भारताबरोबर चांगले संबंध राखण्यावर भर दिला आणि दोन्ही देशांसाठी ते फायद्याचे असल्याचे सांगितले. त्यामुळे भारताबरोबर विविध मुद्यांबाबत चर्चा करण्यात येईल असेही त्या म्हणाल्या. अमेरिकेचे राज्यमंत्री जॉन केरी भारताचे परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पास्की म्हणाल्या. खोब्रागडे यांच्यावरील खटला ही आता कायदेशीर बाब असून त्यात सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही असे त्यांनी सांगितले. त्यामुळे भारताचे जे काही मतभेद आहेत ते अमेरिकेच्या कायदा यंत्रणेशी असल्याचे म्हणणे योग्य ठरेल अशी पुस्तीही त्यांनी जोडली आहे.