शरीफ यांचे वादग्रस्त वक्तव्य प्रसिद्ध केल्याने कारवाई; ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’चा आरोप

पाकिस्तानचे पदच्युत अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी मुंबईतील २००८ मधील हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनीच केल्याचे खळबळजनक वक्तव्य केल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर आता ‘डॉन’ या इंग्रजी वृत्तपत्राचे वितरण रोखण्यात आल्याचा आरोप ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेने केला आहे.

शरीफ यांची मुलाखत ‘दी डॉन’ या वृत्तपत्राच्या १२ मे रोजीच्या अंकात प्रसिद्ध केली होती. त्यानंतर पंधरा मे पासून त्याचे वितरण रोखण्यात आले. हा पाकिस्तानातील माध्यम स्वातंत्र्यावरील मोठा हल्ला आहे, असे ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संस्थेने म्हटले आहे. बलुचिस्तान, सिंध प्रांतातील काही शहरे व लष्करी कॅन्टोन्मेंट या भागात डॉनचे वृत्तपत्र वितरित करण्यात आले नाही. पाकिस्तानात दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. ते दहशतवादी या देशाचे नागरिक नसतीलही, पण आपण त्यांना सीमा पार करून मुंबईत जाऊ देणे योग्य होते का, त्याचे स्पष्टीकरण करा, आपण त्यांच्याविरोधात सुनावणी का पूर्ण केली नाही असे सवाल शरीफ यांनी त्या मुलाखतीत केले होते. शरीफ यांच्या वक्तव्यावर राष्ट्रीय सुरक्षा समितीने टीका केली होती. त्यात शरीफ यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. ‘डॉन’ या वृत्तपत्राने पाकिस्तानचा अवमान केला असून स्वतंत्र देशाची एकता व सार्वभौमत्व धोक्यात आणले, असे मत व्यक्त करीत प्रेस कौन्सिल ऑफ पाकिस्तानने डॉनच्या संपादकांना नैतिक आचारसंहितेचा भंग केल्याची नोटीस दिली.

‘डॉन’ वृत्तपत्राचे वितरण रोखल्याने पाकिस्तानात अजूनही लष्कराची मजबूत पकड असल्याचे सिद्ध झाले आहे. लोकशाही पद्धतीने तिथे कुठल्याही प्रश्नावर चर्चा होऊ दिली जात नाही, अशी टीका ‘रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्स’ या संघटनेने केली आहे. नवाझ शरीफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी दोन्ही बाजूच्या सदस्यांनी के ली होती. पाकिस्तानातील लष्कर ए तोयबा या  संघटनेच्या दहशतवाद्यांनी नोव्हेंबर २००८ मध्ये केलेल्या हल्ल्यात १६६ जण ठार झाले होते. त्यात अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते.