सीबीएसई बोर्डाच्या फुटलेल्या पेपरची फेरपरीक्षा घेण्याच्या निर्णयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी टीका केली असून स्वत:ची चूक सुधारायची सोडून विद्यार्थ्यांना कसल्या परीक्षा द्यायला लावतात असा सूर लावला आहे. देशभरातल्या विद्यार्थ्यांच्या पाठिशी आपण असून त्यांनी फेरपरीक्षा देऊ नये असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.
सीबीएसई बोर्डाच्या बारावीचा अर्थशास्त्र व दहावीचा गणिताचा पेपर फुटला आणि देशभर एकच कल्लोळ झाला. या पेपरची फेरपरीक्षा घेण्याचे जाहीर झाले आणि लाखो विद्यार्थ्यांच्या पोटात अक्षरश: गोळा आला.
राज ठाकरेंनी जाहीर केलेल्या पत्रात म्हटलंय की, “सस्नेह जय महाराष्ट्र,
सीबीएसईच्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका परीक्षे आधीच फुटल्या, हा मुळात सरकारचा हलगर्जीपणा, पण स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावत आहेत? सरकारला जर प्रश्नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यात विद्यार्थ्यांचा काय दोष, त्यांनी का पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला बसायचं?

[jwplayer q1fG31Hp]
माझं देशभरातील पालकांना आवाहन आहे की कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका. तुम्ही झुकताय हे जर सरकारच्या लक्षात आलं तर ते तुम्हाला अजून वाकवायचा प्रयत्न करेल. तुम्ही निर्णयावर ठाम रहा, सरकारला काय निर्णय घ्यायचा असेल तो घेऊ दे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना देशभरातील विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या पाठीशी ठाम उभी आहे, उभी राहील.”
राज ठाकरेंच्या या आवाहनाला पालक कसा प्रतिसाद देतात व सरकार काय भूमिका घेतं हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे.