ढोंगी गोरक्षकांची कानउघडणी केल्याच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीरपणे टीका करणे टाळा, असा सामोपचाराचा सल्ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघ परिवारातील संघटनांना दिला आहे. ते बुधवारी आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यवाहकांच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलासह संघाशी संबंधित असलेल्या इतर संघटनांना मोदींच्या वक्तव्याविरुद्ध संताप व्यक्त करून मिळणाऱ्या प्रसिद्धीपासून दूर राहा, असे सांगितले. गेल्या काही दिवसांत विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया या भाजपला अडचणीत आणत असून त्यामुळे संघ परिवारात दुही निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत असल्याचे भागवत यांनी म्हटले.
नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी गोरक्षणाच्या नावाखाली दलितांवर होण्या-या हल्ल्यांविषयी भाष्य केले होते. तथाकथित गोरक्षकांपैकी बहुतांश लोक ‘समाजकंटक’ असून ते गोरक्षणाच्या नावावर दुकानदारी चालवत आहेत, अशा शब्दांत त्यांनी या लोकांची कानउघाडणी केली होती. त्यानंतर मोदी यांनी गोरक्षकांचा अपमान केल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केला होता. हा केवळ गोमातेचाच नव्हे, तर हिंदूंचा अपमान असल्याचे तोगडियांनी म्हटले होते. मात्र, पंतप्रधानांवर अशाप्रकारची जाहीर टीका करणे टाळावे, असे सांगत भागवत यांनी भाजप आणि हिंदू संघटनांमध्ये एकप्रकारे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.

या मेळाव्यात भागवत यांनी आगामी उत्तराखंड आणि उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपला जिंकण्यासाठी मदत करण्याच्या रणनीतीसंदर्भातही चर्चा केली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी आम्हाला एकजूट होण्यास सांगितले. सर्व संघटनांचा कारभार स्वतंत्र असला तरी राष्ट्रनिर्माण आणि विकासासाठी या संघटनांमध्य समन्वय असणे गरजेचे आहे. त्यामुळे भागवत यांनी आम्हाला देशासाठी निस्वार्थीपणे काम करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती ब्रज प्रांत प्रचारक प्रदीप यांनी दिली. या मेळाव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अन्य ३३ संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते. यामध्ये विहिंप, भाजप, विद्याभारती , अखिल भारतीय मजदूर संघ, किसान संघ, सहकार भरती, क्रीडा भारती, पूर्व सैनिक सेवा परिषद, राष्ट्रीय संघ शीख संगत, विज्ञान भारती, लघू उद्योग भारती या संघटनांचा समावेश होता.