भारतीय जवानांनी आणि सामान्य जनतेने सोशल मीडियावरील अफवांचे मेसेजेस फॉरवर्ड करू नयेत, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ते गुरूवारी सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या भारतविरोधी अपप्रचारावर चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर भारताच्या शत्रूंकडून अफवा पसरवल्या जात आहेत. काहीवेळा भारतीय सैन्यातील जवान आणि अधिकारीही कोणतीही खातरजमा न करता व्हॉटसअॅप किंवा फेसबुकवर हे मेसेजेस फॉरवर्ड करतात. त्यामुळे किमान तुम्हीतरी देशाचा विचार करून खातरजमा केल्याशिवाय अशाप्रकारचे मेसेजेस फॉरवर्ड करू नका, असे आवाहन मी करतो. मी तुम्हाला हे सांगत आहे कारण तुमच्यावर केवळ सीमेवरच्या सुरक्षेचीच जबाबदारी नाही. तर तुमच्यावर देशाची एकात्मता आणि अखंडता कायम राखण्याचीही जबाबदारी आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.  तसेच भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधून होणारी घुसखोरी कमी झाल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. तसेच सीमारेषेवर सीमा सुरक्षा दल, गुप्तचर यंत्रणा आणि पोलीस अशी त्रिस्तरीय सुरक्षाव्यवस्था प्रस्थापित आमचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

काश्मीरमध्ये घुसखोरीसाठी तयार असलेल्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या नव्या बॅचचा फोटो व्हायरल

गेल्या काही दिवसांत भारत-पाक सीमेवरील तणाव कमालीचा वाढला आहे. कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत अनेक दहशतवाद्यांना ठार मारले होते. काही दिवसांपूर्वी काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये भारतीय सैन्यबरोबरच्या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर सबझार अहमद ठार मारला गेला होता. सबझार अहमद याच्या खात्म्यानंतर आता हिजबुल मुजाहिद्दीन ही दहशतवादी संघटना पुन्हा एकदा भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी पाकव्याप्त काश्मीरमध्ये नव्या दमाच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. हिजबुल मुजाहिद्दीनच्या या नव्या बॅचचा फोटो बुधवारी इंटरनेटवर व्हायरल झाला होता. ‘एएनआय’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबाद येथील तळावर नव्या तुकडीला प्रशिक्षण दिले जात आहे. या तुकडीत २७ दहशतवाद्यांचा समावेश असून त्यांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असल्याचे समजते.