भारत बायोटेकच्या करोनावरील कोवॅक्सीन या लसीला ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया म्हणजेच डीसीजीआयने आप्ताकालीन वापरासाठी परवानगी दिल्याबद्दल अनेकांनी आक्षेप घेत नाराजी व्यक्त केल्याचं पहायला मिळालं. या लसीची सुरक्षा, दर्जा, परिणामकारकता आणि माहिती यासंदर्भातील पारदर्शकतेवरुन अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. याचदरम्यान आता भारत बायोटेकचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असणाऱ्या कृष्णा एल्ला यांनी कोवॅक्सीन ही २०० टक्के सुरक्षित असल्याचं म्हटलं होतं. आम्हाला लस बनवण्याचा अनुभव असून आम्ही सर्व वैज्ञानिकांचे सल्ले गांभीर्याने घेतो, असंही कृष्णा म्हणाले होते. कोवॅक्सीनच्या प्रतिकूल परिणामांबद्दल म्हणजेच साइड इफेक्टबद्दल बोलताना कृष्णा यांनी कोणालाही इम्यूनो कॉम्प्रोमाइज्ड म्हणजेच रोगप्रतिकारशक्तीसंदर्भातील समस्या किंवा आधीपासून काही आजारांवरील औषध सुरु असतील तर त्यांनी सध्या कोवॅक्सीन घेऊ नये असं सांगितलं आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सीनसंदर्भातील सर्व शंका दूर करण्यासाठी जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये यासंदर्भातील माहिती दिली आहे.

नक्की वाचा >> गांजा वाचवू शकतो करोना रुग्णांचे प्राण; संशोधकांचा दावा

आधी सरकार म्हणालं होतं…

यापूर्वी सरकारने इम्यूनो सप्रेसेंट किंवा इम्यूनो डेफिशिएन्सी असणाऱ्या व्यक्तींनाही कोवॅक्सीने घेता येईल असं म्हटलं होतं. मात्र चाचण्यांदरम्यान अशा व्यक्तींवर करोनाची लस फारशी प्रभावी ठरत नसल्याचं दिसून आलं. सामान्यपणे केमोथेरपी करणारे कॅन्सरचे रुग्ण, एचआयव्हीचा संसर्ग झालेले रुग्ण आणि स्टेरॉइडचे सेवन करणारे इम्यूनो-सप्रेस्ड असतात. म्हणजेच अशा व्यक्तींची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमी असते.

भारत बायोटेक म्हणते, अशा व्यक्तींनी कोवॅक्सीन घेऊ नये 

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार ज्या लोकांना रक्ताशी संबंधित आजार आहे किंवा ब्लड थीनर्सचा त्रास आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं म्हटलं आहे. सध्या जे आजारी आहेत, ज्यांना मागील काही दिवसांपासून ताप किंवा एखाद्या गोष्टीची अ‍ॅलर्जी आहे त्यांनाही कोवॅक्सीन घेऊ नये असं कंपनीने स्पष्ट केलं आहे. गरोदर महिला आणि ब्रेस्ट फीडिंग करणाऱ्या महिला म्हणजेच नवजात बालकांच्या मातांनाही सरकारने लसीकरणाच्या कार्यक्रमातून यापूर्वीच वगळले आहे.

नक्की वाचा >> इस्रायल : करोना लसीकरणानंतर १३ जणांना Facial Paralysis; साईड इफेक्ट झालेल्यांचा आकडा वाढण्याची भीती

लस घेतल्यानंतर साईड इफेक्ट दिसल्यास

कोवॅक्सीन घेतल्यानंतर कोणालाही करोना १९ ची लक्षणं दिसून आली तर त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करुन घ्यावी असा सल्लाही भारत बायोटेकने आपल्या फॅक्टशीटमध्ये दिला आहे. आरटी-पीसीआर चाचणीच्या निकालांनाही पुरावा म्हणून कंपनीकडून ग्राह्य धरलं जाणार आहे. आम्ही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे सल्ले दिले आहेत असंही भारत बायोटेकने स्पष्ट केलं आहे. “करोना लसीकरणानंतरही कोणामध्ये करोनाची लक्षणं दिसून आली तर ती खूप सौम्य असतात. कोवॅक्सीनमुळे कोणत्याही प्रकराची अ‍ॅलर्जी होत नाही. अशी अ‍ॅलर्जी होण्याची शक्यता खूपच कमी आहे. खूपच दुर्मीळ प्रकरणांमध्ये असं होतं,” असंही भारत बायोटेकने म्हटलं आहे.

लस घेणारी व्यक्ती इतर औषधं घेत असेल तर

कंपनीने जारी केलेल्या फॅक्टशीटमध्ये, “कोवॅक्सीन घेतल्यानंतर काही तासांनंतर तुम्हाला काही साईड इफेक्ट दिसले किंवा करोनासारखी लक्षणं आढळून आली तर तुम्हाला ज्या व्यक्तीने लस दिली त्याला यासंदर्भातील माहिती द्या. तुम्ही करोनाची लस घेण्याआधी किंवा घेतल्यानंतर काही औषधं घेत असाल तर त्याचीही स्पष्ट आणि योग्य माहिती द्यावी,” असं नमूद करण्यात आलं आहे.

नक्की वाचा >> करोना : ‘तो’ १९ ऑक्टोबरपासून अमेरिकेतील विमानतळावरच राहत होता, कारण विचारल्यावर म्हणाला…

…तर तो फॉर्म भरुन द्यावा

करोनाची लस घेतल्यानंतर करोना १९ पासून वाचण्यासाठी आतापर्यंत पालन करत आलेल्या नियमांचे पालन करु नये असा लसीकरणाचा अर्थ होत नसल्याचं भारत बायोटेकने म्हटलं आहे. करोनाची लस घेतलेल्यांना एक फॅक्टशीट आणि फॉर्म देण्यात येतो. लस घेतलेल्या व्यक्तीमध्ये प्रतिकूल परिणाम दिसल्यास त्याने सात दिवसांच्या आत तो फॉर्म भरुन जमा करणे अपेक्षित आहे.

कंपनी देणार नुकसानभरपाई

भारत सरकारने भारत बायोटेककडून कोवॅक्सीनेचे ५५ लाख डोस खरेदी केले आहेत. करोनाची लस घेतल्यानंतर साइड इफेक्ट दिसल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जाईल अशी घोषणा भारत बायोटेकने केली आहे. करोनाची लस देण्यात येणाऱ्या व्यक्तीला एका सहमती पत्रावर स्वाक्षरी करावी लागणार असल्याचेही कंपनीने म्हटलं आहे. काही विपरित परिणाम झाल्यास कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात येईल. लस देण्यात आल्यानंतर कोणालाही काही त्रास झाल्यास त्याच्यावर उपचार करण्यासाठी सरकारी रुग्णालयामध्ये सोय उपलब्ध करुन दिली जाईल असंही कंपनीने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> Corona Vaccination : कर्मचाऱ्यांचे लसीकरण करणार देशातील ‘या’ बड्या कंपन्या; लस खरेदीसाठी हलचाली सुरु

तिसऱ्या टप्प्यातील आकडेवारीवर अभ्यास सुरु

पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायर्समध्ये कोवॅक्सीनमध्ये अ‍ॅण्टीडोट्स निर्माण करण्याची क्षमता दिसून आली. लस निर्माण करणाऱ्या कंपनीने लसीच्या क्लिनिकल क्षमतेसंदर्भातील निकाल अद्याप समोर येणं बाकी असल्याचं स्पष्ट केलं. तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलच्या आकडेवारीचा सध्या अभ्यास केला जातोय.