निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी लागण होण्याच्या भीतीने अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्यानंतर एका डॉक्टरने माणुसकी दाखवत मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. नातेवाईकांनी नकार दिल्याने बेवारस झालेल्या या मृतदेहांची जबाबदारी अखेर डॉक्टर आर एस गोपकुमार यांनी घेतली. डॉक्टर गोपकुमार यांच्याकडे १२ मृतदेहांची जबाबदारी होती. या सर्व मृतदेहांच्या शेवटच्या प्रवासाची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर होती.

‘तीन मृतदेहांची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले’, अशी माहिती ४१ वर्षीय डॉक्टर गोपकुमार यांनी दिली आहे. निपाह व्हायरसमुळे एकूण १७ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १३ मृत्यू कोझीकोडे आणि ३ मल्लपुरम येथे झाले आहेत.

डॉक्टर गोपकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ वर्षीय मुलाचा निपाह व्हायरसमुळे मृत्यू झाला होता. त्याच्या आईला लागण झाल्याची भीती असल्याने वॉर्डमध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आलं होतं. त्याच्यावर मीच अंत्यसंस्कार केले. आपल्या मुलाला शेवटचं पाहणंही त्याच्या आईच्या नशिबात नव्हतं. त्यांच्या परवानगीनेच अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘त्यांच्या शेवटच्या प्रवासात एकही त्याचा नातेवाईक अंत्यसंस्कारासाठी हजर नसल्याने मला खूप वाईट वाटत होतं. मी हिंदू पद्धतीनेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले, जेणेकरुन त्याचा अखेरचा प्रवास तरी सन्मानाने व्हावा. हे माझं कर्तव्य होते’, असं त्यांनी सांगितलं आहे.

एका ५३ वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांनी आपण अंत्यसंस्कार करणार नसल्याचं सांगितलं. यानंतर डॉक्टर गोपकुमार यांनीच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. याशिवाय अजून एका तरुणीवरही त्यांनाच अंत्यसंस्कार करावे लागले.