दक्षिण आफ्रिकेचे माजी अध्यक्ष नेल्सन मंडेला यांना जीवरक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले असून त्यांचे अवयव निकामी झाले असल्याची खात्री पटेपर्यंत ही प्रणाली काढण्यात येणार नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्याचे मंडेला यांच्या निकटच्या सहकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
मंडेला यांना लावण्यात आलेली जीवरक्षक प्रणाली काढून टाकण्याबाबत चर्चा करण्यात आली आणि त्यानंतर ती काढून न टाकण्याचा निर्णय घेण्यात आला, असे मंडेला यांचे मित्र डेनिस गोल्डबर्ग यांनी ‘सिटी प्रेस’ या साप्ताहिकाला सांगितले.
मंडेला यांचे अवयव निकामी झाल्याची खात्री पटेपर्यंत त्यांच्या शरीराला बसविण्यात आलेली जीवरक्षक प्रणाली न काढण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला असल्याचे आपल्याला सांगण्यात आले, असे गोल्डबर्ग म्हणाले. तथापि, मंडेला यांचे अवयव निकामी झालेले नसल्याने त्यांची प्रकृती स्थिर होईपर्यंत जीवरक्षक प्रणाली कायम ठेवण्यात येणार आहे.