सरकारद्वारे देशांतर्गत विमान सेवांच्या तिकिटांचे किमान आणि कमाल दर काही महिन्यांच्या कालावधीसाठी निश्चित करण्यात आले होते. दरम्यान,  २४ नोव्हेंबरनंतरही फेब्रुवारी महिन्यापर्यंत ते दर कायम राहणार असल्याची माहिती नागरी उड्डयन मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली. २१ मे रोजी सरकारनं देशांतर्गत विमानांच्या तिकिटांसाठी कमाल आणि किमान दर निश्चित केले होते. सर्वप्रथम २४ ऑगस्टपर्यंत ते दर निश्चित करण्यात आले होते. त्यानंतर त्या कालमर्यादेत वाढ करून २४ नोव्हेंबरपर्यंत कमाल आणि किमान दर निश्चित करण्यात आले. त्यानंतर पुन्हा एकदा तीन महिन्यांसाठी याला मुदतवाढ देण्यात आली आहे.

“या महिन्याच्या अखेरपर्यंत देशांतर्गत विमानसेवा पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. त्यानंतर निश्चित करण्यात आलेले तिकिटांचे किमान आणि कमाल दर हटवण्यास कोणतीही अडचण नसेल,” असंही हरदीप सिंह पुरी यांनी स्पष्ट केलं. करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मार्च महिन्यात देशात लॉकडाउन लागू करण्यात आलं होतं. त्यावेळी देशातील विमानसेवाही बंद ठेवण्यात आली होती. लॉकडाउननंतर तब्बल दोन महिन्यांनी म्हणजेच २५ मे रोजी विमानसेवा सुरू करण्यात आली होती. २१ मे रोजी डीजीसीएनं तिकिटांच्या दरासाठी कमाल आणि किमान दर निश्चित करत सात बँडची घोषणा केली होती.

काय आहेत सात बँड ?

पहिल्या बँडमध्ये त्या उड्डाणांचा समावेश आहे ज्यांचा कालावधी ४० मिनिटांपेक्षा कमी आहे. पहिल्या बँडमधील उड्डाणांसाठी किमान २ हजार रूपये आणि कमाल ६ हजार रूपये दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यानंतर ४० ते ६० मिनिटं, ६० ते ९० मिनिटं, ९० ते १२० मिनिटं, १२० ते १५० मिनिटं, १५० ते १८० मिनिटं आणि १८० ते २०० मिनिटं असे बँड तयार करण्यात आले आहेत. डीजीसीएद्वारे याचे किमान आणि कमाल दर २,५०० रूपये ते ७,५०० रूपये, ३,००० रूपये ते ९,००० रूपये, ३,५०० रूपये ते १०,००० रूपये, ४,५०० रूपये ते १३,००० रूपये, ५,५०० रूपये ते १५,७०० रूपये आणि ६,५०० रूपये ते १८,६०० रूपये इतके निश्चित करण्यात आले आहेत.