डोनाल्ड ट्रम्प यांची स्पष्टोक्ती

वॉशिंग्टन : भारताच्या आताच्या भेटीत व्यापार करार केला जाणार नाही त्यावर निवडणुकीनंतर  विचार करू, असे अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. याआधी त्यांचा दौरा निश्चित होताच असा करार होण्याची शक्यता सूचित करण्यात आली होती. नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका होणार आहेत त्यामुळे आताच हा करार होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ट्रम्प यांनी आतापर्यंत ‘अमेरिका प्रथम’ धोरण  जोरकसपणे लावून धरले असताना भारताला त्यांनी व्यापार करांचा महाराजा (टॅरिफ किंग) म्हटले होते. अमेरिकी वस्तूंवर जास्त आयात कर लागू केल्याबाबत त्यांनी अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. भारताबरोबर व्यापार करार केला जाईल, पण आताच्या भेटीत नाही तर पुढे कधीतरी तो केला जाईल असे सांगून ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वी असा करार होणार नाही, पण भारताशी मोठा व्यापार करार नंतर होऊ शकतो.

अमेरिका-भारत व्यापार असमतोलावर ट्रम्प यांनी चिंता व्यक्त केली ते म्हणाले की, भारताने आम्हाला  व्यापारात नीट वागणूक दिलेली नाही. अमेरिकेचे व्यापार प्रतिनिधी रॉबर्ट लाईटझियर यांचा समावेश ट्रम्प यांच्या शिष्टमंडळात नाही असे सांगण्यात येत असले तरी ते ट्रम्प यांच्याबरोबर येणारच नाहीत असे स्पष्टपणे म्हणता येत नाही. अ‍ॅल्युमिनियम उत्पादनांवर अमेरिकेने लादलेले कर कमी करावेत असे भारताचे मत आहे. व्यापार अग्रक्रम प्रणालीतील वस्तूंवर कर लागू करण्याची प्रक्रिया बंद करावी कारण आधी या उत्पादनांना करातून सूट देण्यात आली होती असेही  भारताचे म्हणणे आहे. भारताबरोबरच्या  व्यापारात २०१८-१९ अखेर १६.९ अब्ज डॉलर्सची तूट आहे असे अमेरिकेचे म्हणणे आहे.

२५ फेब्रुवारीला मोदी-ट्रम्प यांच्यात व्यापक मुद्दय़ांवर चर्चा

नवी दिल्ली : संरक्षण आणि व्यापार यांसह अनेक प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २५ फेब्रुवारीला चर्चा करतील, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बुधवारी सांगितले.

२४ व २५ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार असलेले ट्रम्प यांच्यासोबत एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळही राहील अशी माहिती देतानाच, भारत व अमेरिका यांच्यात ऐतिहासिक संमीलन असल्याचे शृंगला म्हणाले.

अहमदाबादमध्ये होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम गेल्या वर्षी ह्य़ूस्टनमध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या धर्तीवर राहणार आहे. मोदी व ट्रम्प हे २५ फेब्रुवारीला संरक्षण आणि व्यापार यांसह व्यापक मुद्यांवर चर्चा करतील, असेही शृंगला यांनी सांगितले.

मोदी हे ट्रम्प यांच्यासाठी दुपारचे भोजन आयोजित करणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही ट्रम्प यांच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवणार आहेत, अशी माहिती शृंगला यांनी दिली.

भारत व अमेरिका हे घाईघाईने व्यापारविषयक करार करू इच्छित नसून, दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर ते याबाबत निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांच्या दौऱ्यात काही संरक्षणविषयक करार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.