अमिरेकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलेनिया २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद, आग्रा आणि नवी दिल्लीला भेट देणार आहेत. कोलोरॅडो येथील ‘कीप अमेरिका ग्रेट’ मेळाव्यात बोलताना ट्रम्प म्हणाले की, मागील काही वर्षांपासून भारताने चढे आयात कर लावले असून त्यामुळे अमेरिकेला व्यापारात मोठा फटका बसला आहे. भारत दौऱ्यापुर्वीच ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे मोदी सरकारला धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मी पुढील आठवड्यात भारता दौऱ्यावर जाणार आहे. त्यावेळी भारताशी व्यापारावर चर्चा होईल. त्यांनी आमच्या वस्तूंवर इतकी वर्षे बरेच कर लादले त्याचा आम्हाला व्यापारात आर्थिक फटका बसला आहे. मोदी मला खरोखर आवडतात, मी त्यांच्याशी व्यापारावर चर्चा करणार आहे. पण आताच्या भेटीत कोणताही व्यापार करार केला जाणार नाही, फक्त त्यावर चर्चा होईल.

निवडणुकीनंतर व्यापर करारावर विचार केला जाईल. अमेरिकेच्या फायद्याचा असेल तरच व्यापार करार केला जाईल. कुणाला आवडो न आवडो आमच्यासाठी अमेरिका प्रथम हे धोरण कायम आहे, असे ट्रम्प म्हणाले. अमेरिकेच्या जगातील एकूण व्यापारापैकी तीन टक्के व्यापार भारताशी निगडित आहे.

अहमदाबाद विमानतळापासून ते मोटारा स्टेडियम या मार्गावर सात दशलक्ष लोक आपल्या स्वागतासाठी येतील, असे मोदी यांनी सांगितल्याचे ट्रम्प मंगळवारी म्हणाले होते. मात्र आता १० दशलक्ष लोक स्वागतासाठी येतील असा दावा ट्रम्प यांनी केला.एका नवीन स्टेडियमवर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ‘नमस्ते ट्रम्प मेळावा’ अहमदाबाद येथे होणार असून त्यामुळे मलाही अचंबित झाल्यासारखे वाटेल. भारतात जर एक कोटी लोक आले तर आपल्या देशात सभेसाठी होणारी गर्दी यापुढे किरकोळ वाटेल.

२५ फेब्रुवारीला मोदी-ट्रम्प यांच्यात व्यापक मुद्दय़ांवर चर्चा

संरक्षण आणि व्यापार यांसह अनेक प्रमुख क्षेत्रांमधील सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे २५ फेब्रुवारीला चर्चा करतील, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी बुधवारी सांगितले.  २४ व २५ फेब्रुवारीला भारताच्या दौऱ्यावर येणार असलेले ट्रम्प यांच्यासोबत एक उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळही राहील अशी माहिती देतानाच, भारत व अमेरिका यांच्यात ऐतिहासिक संमीलन असल्याचे शृंगला म्हणाले.  अहमदाबादमध्ये होणारा ‘नमस्ते ट्रम्प’ हा कार्यक्रम गेल्या वर्षी ह्य़ूस्टनमध्ये झालेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमाच्या धर्तीवर राहणार आहे. मोदी व ट्रम्प हे २५ फेब्रुवारीला संरक्षण आणि व्यापार यांसह व्यापक मुद्यांवर चर्चा करतील, असेही शृंगला यांनी सांगितले.  मोदी हे ट्रम्प यांच्यासाठी दुपारचे भोजन आयोजित करणार असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हेही ट्रम्प यांच्या सन्मानार्थ मेजवानी ठेवणार आहेत, अशी माहिती शृंगला यांनी दिली. भारत व अमेरिका हे घाईघाईने व्यापारविषयक करार करू इच्छित नसून, दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केल्यानंतर ते याबाबत निर्णय घेतील, असे सूत्रांनी सांगितले. ट्रम्प यांच्या दौऱ्यात काही संरक्षणविषयक करार होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Donald trump taking about business with india nck
First published on: 22-02-2020 at 13:00 IST