संपूर्ण हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदारांनी दिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील घोषणांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अखेरच्या दिवशी मनाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात उपस्थित असताना त्यांच्याविरोधात घोषणा देणारे काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना सोनिया गांधी यांनी खुणेनेच मोदींविरोधात घोषणाबाजी न करण्याचा आदेश दिला. त्यानंतर पंतप्रधानांविरोधातील घोषणाबाजी थांबली.
प्रश्नोत्तराचा तास नेहमीप्रमाणे गोंधळातच सुरू झाला. डीडीसीएच्या मुद्दय़ावरून केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरोधात काँग्रेस खासदार घोषणा देत होते. लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर त्यांची घोषणाबाजी सुरू होती. त्यात अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणा दिली. त्यानंतर सोनिया गांधींनी चौधरी यांना इशाऱ्यानेच मोदींविरोधात घोषणा न देण्याचे बजावले. चौधरी यांनी आज्ञाधारकपणे मोदींविरोधातील घोषणा थांबविल्या. गेल्या महिनाभरापासून मोदींविरोधात दिल्या जाणाऱ्या घोषणांमध्ये अखेरच्या दिवशी का होईना खंड पडला!