माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या राजकीय कारकीर्दीवर आधारित ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर अल्पावधितच हा चित्रपट वादात सापडला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेल्या काही दृश्यांवर युथ काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे तर काही काँग्रेस नेत्यांनी देखील त्याच्यावर बंदी आणण्याचा इशारा दिला आहे.

हा वाद सुरू असताना कवी कुमार विश्वास यांनी या संपूर्ण वादावर उपरोधिक टीका केली आहे. ‘देशातील सर्वेच महत्त्वाचे मुद्दे खड्ड्यात जाऊ दे. आता चित्रपट बघा आणि ठरवा मत कोणाला द्यायचं आहे ज्यानं चांगला अभिनय केला त्याला की जो चांगला अभिनय करतोय त्याला., आता सर्वांनी शांतता राखा कारण नाटक चालू आहे.’ असं म्हणत कुमार विश्वास यांनी काँग्रेससह पंतप्रधान मोदींना देखील टोला लगावला आहे.

 

या चित्रपटावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट आम्हाला दाखवा अन्यथा मध्यप्रदेशात तो प्रदर्शित होऊ देणार नाही असा इशारा मध्यप्रदेशातील काँग्रेस नेते सय्यद जफर यांनी दिला आहे. तर दुसरीकडे युथ काँग्रेसनंही या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य काढून टाकण्याचा इशारा दिला आहे. ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर काँग्रेसमधल्या अनेक कार्यकर्त्यांनी यावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसची मदार असलेल्या  राज्यात या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी होत आहे या सर्व वादावर उपरोधिक टिका करत विश्वास यांनी काँग्रेसला आपल्या ट्विटमधून चिमटे काढले आहे, तर दुसरीकडे मोदींवरही नाव न घेता त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली आहे. ११ जानेवारी २०१९ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होत आहे.मनमोहन सिंग पंतप्रधान असताना काही काळ त्यांचे माध्यम सल्लागार असलेले संजय बारू यांनी लिहीलेल्या ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ या पुस्तकावर तो आधारलेला आहे.