तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांसाठीच्या मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातल्या या मोठ्या राज्यात प्रचार शिगेला पोहोचला आहे. द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात द्रमुक आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम अर्थात अद्रमुक या दोन पक्षांमध्ये हा थेट सामना होत आहे. याच प्रचारादरम्यान DMK नेते ए. राजा यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री इडाप्पडी पलानीस्वामी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे गेल्या दोन दिवसांपासून तमिळनाडूमधलं राजकारण ढवळून निघालं होतं. जाहीर सभेमध्ये खुद्द मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात अश्रू आल्यानंतर ए. राजा यांना उपरती झाली आणि त्यांनी आपल्या चुकीची जाहीर माफी मागितली. आता हे अश्रू आणि ही माफी, हे खरेच होते की ६ तारखेला होणाऱ्या मतदानासाठीची खेळी होती, यावर तमिळनाडूच्या राजकीय वर्तुळाच चर्चा सुरू झाली आहे.

…आणि ए. राजा भलतंच बोलून गेले!

काही दिवसांपूर्वी एका प्रचारसभेत बोलताना ए राजा यांनी पलानीस्वामी यांची तुलना डीएमकेचे अध्यक्ष M. K. Stalin यांच्याशी केली. “स्टॅलिन यांनी १ वर्ष तुरुंगात काढलं आहे. ते जिल्हाध्यक्ष राहिले आहेत. जनरल कौन्सिलचे सदस्य राहिले आहेत. युवा संघटनेचे अध्यक्ष, नंतर पक्षाचे खजिनदार, पुढे कार्यकारी अध्यक्ष आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर पक्षाचे अध्यक्ष झाले. त्यामुळे असं म्हणता येईल की स्टॅलिन यांचा योग्य पद्धतीने, ९ महिन्यांचा काळ काढून, वैध लग्न-विधीनंतरच (राजकीय विश्वात) जन्म झाला आहे. पण दुसरीकडे इडाप्पडी हे वेळेपूर्वीच जन्मलेले आणि अचानक आलेले मूल आहेत”, असं राजा म्हणाले होते.

स्टेजवरच रडले मुख्यमंत्री!

ए. राजा यांच्या या वक्तव्यानंतर रविवारी प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री ई. पलानीस्वामी यांना स्टेजवरच रडू आलं. “मी फक्त स्वत:साठी बोलत नाही. पण जर एखाद्या मुख्यमंत्र्याच्याच आईला हे असं काही ऐकावं लागत असेल, तर तुमच्या माता आणि महिला सुरक्षित असतील का? ते सत्तेत आले, तर काय होईल याची तुम्ही कल्पना करू शकता”, असं म्हणत चेन्नईत झालेल्या प्रचारसभेत पलानीस्वामी स्टेजवरच रडले!

“माफी मागताना संकोच नाही!”

यावर बोलताना ए. राजा यांनी पलानीस्वामी यांची जाहीर माफी मागितली आहे. “मुख्यमंत्र्यांना माझ्या वक्तव्यामुळे दु:ख झाल्याचं माध्यमांमध्ये पाहून मला अतीव वेदना झाल्या आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला आहे. पण मी मनापासून घडल्या प्रकाराबाबत दिलगिरी व्यक्त करतो. जर त्यांना माझ्या विधानामुळे वाईट वाटलं असेल, तर राजकारणाच्याही पलीकडे जाऊन त्यांची माफी मागण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही”, असं राजा म्हणाले आहेत.

“मी जिंकलो तर प्रत्येक घरात आयफोन, हेलिकॉप्टर, कार देईन”

ए. राजा यांनी केलेल्या वक्तव्यानंतर एआयएडीएमकेकडून त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. ए. राजा यांना प्रचार करण्यास मनाई करण्यात यावी, अशी देखील मागणी करण्यात आली होती. मात्र, निवडणूक आयोगाने निर्णय घेण्याआधी ए. राजा यांनी माफीनामा जाहीर केल्यामुळे आता यावर निवडणूक आयोगाकडून काय पाऊल उचललं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

युपीए-२ सरकारच्या काळात ए. राजा दूरसंचार मंत्री असताना त्यांच्यावर टूजी घोटाळ्याप्रकरणी आरोप लावण्यात आले होते. काही वर्ष खटला चालल्यानंतर त्यांची निर्दोष मुक्तता देखील करण्यात आली होती.