संरक्षण संशोधन व विकास संस्था माओवाद्यांचा शोध घेऊ शकतील. निर्मनुष्य हवाई वाहन (यूएव्ही) तयार करीत आहे. छत्तीसगड व झारखंडच्या नक्षलवादग्रस्त घनदाट जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घेणे त्यामुळे शक्य होणार आहे. संरक्षण संशोधन व विकास संस्था म्हणजे डीआरडीओचे प्रमुख अविनाश चंदर यांनी संरक्षण सामग्री प्रदर्शनाच्या पाश्र्वभूमीवर ही माहिती दिली.
या निर्मनुष्य हवाई वाहनांचा उपयोग केंद्रीय राखीव पोलीस दलांना करता येईल असे सांगून चंदर म्हणाले, की निशांत हे निर्मनुष्य हवाई वाहन तयार करण्यात आले असून, मार्च व एप्रिल दरम्यान त्याची चाचणी जगदाळपूर येथून घेतली जाईल. अशी एकूण १६ हवाई वाहने तयार केली जातील असे त्यांनी सूचित केले.
केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान छत्तीसगड, झारखंड व नक्षलग्रस्त भागात तैनात केले असून, सध्या ते भारतीय हवाई दल व एनटीआरओचे यूएव्ही वापरत आहे, परंतु त्यांची दाट जंगलात काम करण्याची क्षमता मर्यादित असून भारतीय हवाई दलाने ही हवाई वाहने काढून घेतली आहेत.
चंदर यांनी सांगितले, की आता जी नवीन निर्मनुष्य हवाई वाहने तयार करण्यात येत आहेत ती भारतातील घनदाट जंगलाच्या भागात चांगले काम करू शकतील, कारण त्यांना वेगळय़ा प्रकारचे संवेदक बसवण्यात आले आहेत.
आतापर्यंत भारताच्या उष्णकटीबंधीय घनदाट जंगलात काम करू शकतील असे हवाई वाहनांचे तंत्रज्ञान विकसित करण्यात यश आलेले नाही.
अर्जुन मार्क २ रणगाडय़ाच्या उपयोजित चाचण्यांबाबत त्यांनी सांगितले, की उपयोजित चाचण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत व क्षेपणास्त्र प्रणालीच्या प्रक्षेपणाबाबत काही किरकोळ समस्या आहेत. अर्जुन मार्क २ या रणगाडय़ाच्या चाचण्या राजस्थानात सुरू आहेत.