भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था डीआरडीओने नव्या हायपरसॉनिक मिसाइलच्या निर्मितीवर काम सुरु केले आहे. या मिसाइलचा वेग ध्वनिच्या वेगापेक्षा पाचपट अधिक असेल. या मिसाइलच्या चाचणीसाठी विंड टनेल आणि टेक्नोलॉजीवर लवकरच काम सुरु होईल. एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याहस्ते लवकरच या सुविधा केंद्राचे उद्घाटन होण्याची शक्यता आहे.

आम्ही हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची प्रणाली विकसित करण्यावर अत्यंत गांभीर्याने काम करत आहोत असे एका अधिकाऱ्याने सांगितले. हायपरसॉनिक शस्त्रास्त्र प्रणाली ही पुढच्या पिढीची वेपन सिस्टिम असून या टेक्नोलॉजीवर प्रभुत्व मिळवण्यासाठी अनेक देश प्रयत्न करत आहेत. चीन, रशिया आणि अमेरिका हे शस्त्रास्त्रांमध्ये प्रगत देश आहेत. आपली संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी या देशांच्या हायपरसॉनिक शस्त्रांच्या वेगवेगळया प्रकारच्या चाचण्या सुरु आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या आंतरखंडीय बॅलेस्टिक मिसाइलचा सुपरफास्ट स्पीड असला तरी हायपरसॉनिक मिसाइलची टेक्नोलॉजी एक पाऊल पुढे आहे. या मिसाइलचा माग काढणे किंवा मार्ग रोखणे अशक्य आहे.

अत्याधुनिक बॅलेस्टिक मिसाइल डिफेन्स सिस्टिम विरोधात तग धरुन राहण्यासाठी हायपरसॉनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. आपण कल्पनाही करु शकणार नाही इतक्या वेगवान गतीने पारंपारिक आणि अण्वस्त्र वाहून नेण्यास हायपरसॉनिक मिसाइल सक्षम असेल. भारतात संरक्षण उत्पादन क्षेत्राला चालना देण्यासाठी डीआरडीओ आपले १५०० पेटंटसही देण्यास तयार आहे. यामध्ये कठीण अशा मिसाइल, नौदल टेक्नोलॉजीचा समावेश आहे.

नवीन स्टार्ट अप कंपन्या, मध्यम आणि छोटया कंपन्या मोफतमध्ये हे पेटंट मिळवू शकतात. “भविष्यात हायपरसॉनिक शस्त्रे महत्वपूर्ण ठरणार आहेत. चीनने त्यांच्याकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान असल्याचे दाखवून दिले आहे. अमेरिका आणि रशियाकडे अशा प्रकारचे तंत्रज्ञान आधीपासून उपलब्ध आहे. आता भारतानेही त्या दिशेने काम सुरु केले आहे” असे निवृत्त लेफ्टनंट जनरल विनोद भाटीया यांनी सांगितले.