केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सोमवारी संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अँटी-कोविड औषध २-डीजीचे पहिल्या बॅचचे अनावरण केलं. त्यानंतर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी दिल्ली एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांच्याकडे या औषधाचा साठा सुपूर्द केला.

“आम्ही निश्चिंत राहणार नाही आणि खचून देखील जाणार नाही कोविडविरुद्ध लढाई लढत राहू आणि ती जिंकू. पंतप्रधानांच्या नेतृत्वात ऑक्सिजन उत्पादनाचा प्रश्न सुटला आहे. आता औषधाचा प्रश्नही तितकासा नाही,” असे केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले.

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) विकसित केलेल्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोविड-१९ प्रतिबंधक औषधाला भारताच्या औषध महानियंत्रकांनी (डीसीजीआय) आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिल्यानंतर सोमवारी याचे अनावरण करण्यात आले. हे औषध करोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर सहायक उपचार पद्धती म्हणून वापरले जाईल. ते तोंडावाटे घेता येणार आहे.

‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) हे औषध रुग्णालयात असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यात मदत करत असल्याचे, तसेच प्राणवायूच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे वापर कमी करत असल्याचे प्राथमिक चाचण्यांमध्ये आढळून आले आहे, असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले होते.

२-डीजी हे औषध डीआरडीओतील प्रयोगशाळा असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्सेस (इन्मास)ने हैदराबाद येथील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या सहकार्याने विकसित केले आहे. सहायक उपचारपद्धती (अ‍ॅडजंक्टिव्ह थेरपी) ही प्राथमिक उपचारांना मदत म्हणून वापरली जाते.

२-डीजी कसे काम करते

२-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते. करोनाचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये ते जमा होते आणि करोनाच्या विषाणूला वाढण्यापासून थांबवते. नेमक्या विषाणू संसर्गित पेशींमध्ये जमा होणे हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे. या औषधाचे सहजरीत्या उत्पादन करता येऊन ते देशात मुबलक प्रमाणात उपलब्ध केले जाऊ शकते, असे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.