बिहारमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचं वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे. मात्र राजकीय आखाड्यात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असणारे राजकारणी दुखःद प्रसंगात देखील एकमेकांसोबत पहायला मिळत आहेत. मंगळवारी माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या श्राद्धाच्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री नितीश कुमार, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव एकत्र आले होते.

बिहारमध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे. अशावेळी तेजस्वी यादव आपल्या विरोधकांवर जोरदार टीका करताना पहायला मिळत आहेत. या कार्यक्रमाप्रसंगी तेजस्वी यादव यांनी शेजारी बसलेल्या नितीश कुमारांना निवडणुकीच्या प्रचारामुळे आपला घसा बसल्याचे सांगितले. यावेळी नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांना कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला तसेच प्रचारावेळी घसा नीट राहील असेही सांगितले. आपण प्रचाराच्या भाषणानंतरही कोमट पाणी पिण्याचे विसरत नाही असेही नितीश कुमार यांनी सांगितले. एनडीटीव्हीने या संदर्भात वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- भर प्रचारसभेत तेजस्वी यादव यांच्यावर फेकण्यात आल्या चपला

नितीश कुमारही पूर्वी थंड पाण्यामुळे घसा खराब झाल्याचे पत्रकारांना सांगत असत. त्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी त्यांना थंड पाण्याऐवजी कोमट पाणी पिण्याचा सल्ला दिला होता. फर्नांडिस यांच्या सल्ल्यानुसार नितीश कुमार यांनी कोमट पाणी पिण्यास सुरुवात केली. त्यानंतर निवडणूक प्रचाराच्या काळात घशासंदर्भात कधीही तक्रार केली नाही.

तेजस्वी यादव सध्या निवडणूक प्रचारात नितीश कुमारांवर जोरदार हल्ला करत आहेत. याउलट नितीश कुमार तेजस्वी यांना कमी अनुभवी आणि राजकारणात नविन असल्याचे म्हटले आहे.