भारतीय विमान कंपनी इंडिगोच्या एका विमानाची मंगळवारी पाकिस्तानच्या कराची विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करावी लागली. एका प्रवाशाची प्रकृती बिघडल्याने विमानाचा मार्ग बदलून तातडीने पाकिस्तानच्या कराची विमानतळावर उतरवण्यात आलं. पण दुर्दैवाने तरीही प्रवाशाचा जीव वाचवता आला नाही.


इंडिगो प्रशासनाने या घटनेबाबत माहिती दिली आहे. शारजावरुन लखनऊला जाणाऱ्या विमान क्रमांक 6E 1412 ला मेडिकल इमर्जन्सीमुळे पाकिस्तानच्या कराचीकडे वळवण्यात आले. प्रवाशाची प्रकृती अचानक बिघडल्याने इंडिगोच्या वैमानिकाने इमर्जन्सी लँडिंगसाठी कराची विमानतळाकडे परवानगी मागितली होती. पण दुर्दैवाने प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. विमानतळावर लँडिंगनंतर मेडिकल टीमने प्रवाशाला मृत घोषीत केलं, अशी माहिती इंडिगोकडून देण्यात आली आहे.