कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) या भारतातील सात कोटी व्यापाऱ्यांची शिखर संस्था असलेल्या राष्ट्रीय संस्थेने भारतातील व्यापाऱ्यांसाठी तंत्रज्ञानावर आधारित http://www.bharatemarket.in हे ई-कॉमर्स पोर्टल उपलब्ध करून दिल्याची माहिती ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ चे राष्ट्रीय उपाध्यक्ष ललित गांधी यांनी शुक्रवारी येथे दिली.जगातील पहिलाच प्रयोग असल्याचा दावा त्यांनी केला .

ॲमेझॉन, फ्लिपकार्ट सारख्या ऑनलाइन व्यापार करणाऱ्या विदेशी कंपन्यांनी गेल्या काही वर्षात भारतीय व्यापार क्षेत्राला मोठे आव्हान निर्माण केले होते व त्याचा फार मोठा फटका भारतीय व्यापार क्षेत्राला बसला आहे. या आव्हानाला तोंड देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या आधारेच भारतातील व्यापारी, उत्पादक यांना आधुनिक चेहरा देण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून ‘कॉन्फेडरेशन’ चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी.भरतिया व राष्ट्रीय महामंत्री प्रवीण खंडेलवाल यांनी आज याची अधिकृतपणे घोषणा केली.

भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालय अंतर्गत कार्यरत व्यापार विकास विभागाचा हे प्लॅटफॉर्म बनवण्यामध्ये सक्रिय सहभाग असून, भारतीय व्यापाऱ्यांना बळ देण्यासाठी हे नवीन तंत्रज्ञान व्यापाऱ्यांना सहजपणे उपलब्ध करून देण्यात येत आहे.या तंत्रज्ञानामध्ये भारतातील वेगवेगळ्या भागात व्यापार उद्योग करणारे व्यापारी,उद्योजक यांना इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिले असून, याला तंत्रज्ञानाच्या परिभाषेत ‘फिजिटल’ असे नवीन नामकरण केले आहे.

लहान-मोठे उत्पादक सामावणार
प्रत्यक्ष व्यापार करणारे व्यापारी, उद्योजक हेच या ई-प्लॅटफॉर्मवर सुद्धा सहभागी असणार आहेत. यामध्ये लहान-मोठे उत्पादक व सर्व प्रकारचे व्यापारी यांना सामावून घेतले जाणार असून, या तंत्रज्ञानाची मालकी सुद्धा ‘शेअर होल्डर’ पद्धतीने भारतीय व्यापारी, उद्योजकांची असणार आहे. छोट्यातले छोटे व्यापारी सुद्धा या नवीन कंपनीचे समभाग खरेदी करून याच्या मालकी मध्ये सहभागी होऊ शकणार आहेत.अशाप्रकारे हे ‘व्यापाऱ्यांचे- व्यापाऱ्यांकडून- ग्राहकांसाठी’ अशा संकल्पनेवर आधारित हे नवीन पोर्टल तयार केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.

50 लाख व्यापारी प्लॅटफॉर्मवर
हे नवीन अत्याधुनिक पोर्टल तयार केल्यानंतर, सुरवातीच्या टप्प्यात भारतातील सहा प्रमुख शहरांमध्ये प्रायोगिक स्वरूपात याची चाचणी घेण्यात आली. त्यानंतर ही संख्या वाढवत 90 शहरापर्यंत नेऊन, याच्या सर्व प्रकारच्या चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आज याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली. असून येत्या डिसेंबरपर्यंत देशातील किमान 50 लाख व्यापारी या प्लॅटफॉर्मवर जोडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.या नवीन संकल्पनेमध्ये होलसेल व किरकोळ दोन्ही प्रकारचे व्यापारी समाविष्ट होणार असून व्यापारी ते व्यापारी, व व्यापारी ते ग्राहक या दोन्ही प्रकारचे व्यापार या प्लॅटफॉर्मवरून करण्यात येणार आहे . या नवीन पोर्टलच्या प्रक्रियेमध्ये कॉन्फेडरेशन चे राष्ट्रीय संघटन मंत्री धैर्यशील पाटील यांनीही विशेष योगदान दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

जगातील पहिलाच प्रयोग
ऑनलाइन व्यापार करणाऱ्या जगातील दिग्गजांना भारतीय व्यापाऱ्यांनी दिलेले हे एक मोठे आव्हान ठरणार आहे. जगात अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करून गांधी म्हणाले, भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने विशेषता वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी या संकल्पनेला पाठबळ दिले आहे. तसेच येणाऱ्या काळामध्ये भारत सरकार ई-कॉमर्स व्यवसायासाठी ची नवीन पॉलिसी जाहीर करणार असून, या नवीन पॉलिसीमुळे भारतीय व्यापारयांच्या मालकीचे हे पोर्टल सक्षम होण्यास मदत होईल.