News Flash

पलानीस्वामी यांचा कामकाजाचा पहिला दिवस, दारुची ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय

तामिळनाडूमध्ये राज्य सरकारद्वारे दारुची दुकाने चालवली जातात त्यापैकी ५०० दुकाने बंद होणार

Palanisamy : पलानीस्वामी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि राज्यपाल सी. विद्यासागर राव (संग्रहित छायाचित्र)

गेली अनेक दिवस तामिळनाडूच्या राजकारणात बरीच उलथापालथ झाल्यानंतर आज राज्य सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली. तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री इ. पलानीस्वामी यांनी आज अनेक कामांची घोषणा केली. त्यांच्या आधी ओ. पनीरसेल्वम हे राज्याचे मुख्यमंत्री होते. जयललिता या आजारी असताना ते काळजीवाहू मुख्यमंत्री होते. ते कधीच जयललिता यांच्या खुर्चीवर बसले नव्हते परंतु पलानीस्वामी हे मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर बसले. पदभार स्वीकारल्यानंतर आजचा त्यांचा साधारण कामकाजाचा प्रथम दिवस होता. त्यांनी महत्त्वपूर्ण निर्णयांवर आज स्वाक्षऱ्या केली.

जयललिता यांनी निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करणारे पाच महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतले. त्यापैकी एक महत्त्वाचा निर्णय होता. सरकारी दारुची दुकाने बंद करण्याचा. तामिळनाडूमध्ये सरकारच दारुची दुकाने चालवते. त्यापैकी काही दुकाने जयललिता यांच्या काळात बंद करण्यात आली होती. पलानीस्वामी यांनी ५०० दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दारुची उर्वरित दुकाने टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. दुसरा निर्णय दुष्काळाबाबत घेण्यात आला. माझा प्राधान्यक्रम दुष्काळग्रस्तांच्या समस्या सोडवण्याला असेल असे त्यांनी म्हटले. तामिळनाडूमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुष्काळ आहे. येथील शेतकऱ्यांचे प्रश्न सर्वात आधी सोडवले जातील असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी या दृष्टीने आपण पावले उचलल्याचे ते म्हणाले.

तिसरा निर्णय घेण्यात आला तो म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांना अनुदानावर दुचाकी देण्याचा. ज्या महिला नोकरी करत आहेत त्यांना कार्यालयात जाण्यासाठी अर्ध्या किमतीमध्ये दुचाकी उपलब्ध होईल असे आश्वासन जयललिता यांनी दिले होते. त्यानुसार पलानीस्वामी यांनी आज घेतला आहे. तामिळनाडू राज्यातर्फे १ लाख महिलांना दुचाकी घेण्यासाठी २५,००० रुपयांची मदत केली जाणार आहे. या योजनेसाठी २०० कोटी रुपयांची वार्षिक तरतूद करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त गरोदर महिलांना आर्थिक मदत मिळते त्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.

गरोदर महिलांना १२,००० रुपये आर्थिक साहाय्य मिळत असे यापुढे १८,००० रुपये आर्थिक साहाय्य मिळणार आहे. या योजनेसाठी ३६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांतील घटनाक्रम पाहता, तुम्ही लोकप्रियता मिळावी या दृष्टीने हे निर्णय घेतले आहेत का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, की या घोषणा जयललिता यांच्या काळातीलच आहेत. माझ्यातर्फे फक्त अंमलबजावणी होणार आहे. आम्ही जयललिता यांनी सांगितलेल्या मार्गावर चालत आहोत असे ते म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 7:58 pm

Web Title: e palanisamy tamil nadu chief minister sasikala jayalalitha o panneerselvam
Next Stories
1 दोन हजारच्या नोटांमुळे भ्रष्टाचाराला चालना: रामदेवबाबा
2 कार्ती चिदंबरम यांची विदेशी बॅंकांमध्ये २१ खाती, सुब्रमण्यम स्वामी यांचा आरोप
3 सर्व पेमेंट नेटवर्कसाठी आता एकच ‘भारतक्यूआर’ कोड सुरू
Just Now!
X