गेल्या काही दिवसांपासून राजधानी दिल्लीला भूकंपाचे हादरे जाणवत आहेत. दिल्ली पाठोपाठ रविवारी गुजरातमधील राजकोट शहरही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. रात्री ८ वाजून १३ मिनिटांनी झालेल्या या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा गुजरातमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी हे धक्के जाणवले असून रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ४.४ इतकी होती.

दरम्यान, या भूकंपाचं केंद्र राजकोटपासून ८३ किलोमीटर वायव्येकडे असल्याची माहिती राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राकडून देण्यात आली. तर दुसरीकडे जम्मू काश्मीरमध्येही सोमवारी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. याची तीव्रता रिश्टर स्केलवर ३.२ इतकी होती. दरम्यान यामध्ये कोणतंही नुकसान झालं नसल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

रविवारी रात्री ८.१३ मिनिटांनी राजकोट शहराला भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ५.५ रिश्टर स्केल इतकी होती. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राच्या माहिती प्रमाणे राजकोटपासून ११८ किमी दूर वायव्य दिशेला भूकंपाचा केंद्रबिंदू होता. सुदैवानं या भूकंपात कोणतीही जीवित वा वित्तहानी झालेली नाही.