19 September 2020

News Flash

भारतीय वायुसेनेचं सामर्थ्य अजून वाढलं, आठ ‘अपाचे’ हेलिकॉप्टर्स ताफ्यात दाखल

हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश

भारतीय वायुसेनेच्या ताफ्यात वाढ झाली आहे. हवाई दलाच्या ताफ्यात आठ शक्तिशाली ‘अपाचे’ हेलिकॉप्टर दाखल झाले आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबच्या पठाणकोट हवाईतळावर आठ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे. या हेलिकॉप्टर्सची जगातील सर्वोत्तम लढाऊ हेलिकॉप्टर्समध्ये गणना होते. परिणामी भारतीय हवाई दलाची क्षमता आणि ताकद आता कैकपटीने वाढणार आहे.

जवळपास 280 किलोमीटर प्रतितास वेगाने उड्डाण घेणारं हे हेलिकॉप्टर त्याच्या डिझाइनमुळे रडारमध्ये सहजपणे दिसत नाही. जवळपास पावणे तीन तासांपर्यंत हवेत राहू शकणाऱ्या या हेलिकॉप्टरने दशहतवाद्याचं तळ असो किंवा लढाऊ टँक सर्व उद्ध्वस्त करता येणं शक्य आहे. शत्रूच्या हद्दीत घुसून मोठ्या प्रमाणात विध्वंस करण्याची क्षमता या हेलिकॉप्टर्समध्ये असते. अपाचे एएच-६४ई या जातीचे हे लढाऊ हेलिकॉप्टर अमेरिकी लष्कर वापरतं. जगातील हे सर्वात अत्याधुनिक आणि मल्टी-रोल कॉम्बॅट तसंच शक्तिशाली लढाऊ विमान आहे. 1975 मध्ये अमेरिकेने या हेलिकॉप्टर्सची निर्मिती केली होती तर 1986 मध्ये ही हेलिकॉप्टर्स पहिल्यांदा युद्धभूमीवर वापरण्यात आली होती. अमेरिकेशिवाय नेदरलॅंड्स ,इजिप्त ,इस्राइलच्या ताफ्यातही अपाचे विमानं आहेत.

भारतीय वायुसेनेने सप्टेंबर 2015 मध्ये 4168 कोटी रुपयांमध्ये अमेरिकेच्या बोइंग लिमिटेडसोबत 22 अपाचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानुसार आतापर्यंत आठ हेलिकॉप्टर मिळाले आहेत, पुढील वर्षापर्यंत सर्व 22 हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल होतील. सर्वात शक्तिशाली आणि अचूक मारा करण्याची क्षमता या लढाऊ हेलिकॉप्टरमध्ये आहे, अशी माहिती हवाई दलाचे प्रवक्ता अनुपम बॅनर्जी यांनी दिली. यापूर्वी हवाईदलाच्या ताफ्यात चिनूक हेविवेट हेलिकॉप्टर्सही दाखल झाले आहेत.

काय आहे विशेष ?
AH-64 अपाचे हेलिकॉप्टर जगभरात युद्धासाठी वापरले जाणारे मल्टी रोल हेलिकॉप्टर म्हणून ओळखले जाते.

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिकन सैन्य या हेलिकॉप्टरचा वापर करत आहे. परंतु आता या हेलिकॉप्टर्सचा वापर करणाऱ्या देशांची संख्या वाढली आहे.

सध्या कंपनीने अन्य देशांना 2 हजार 100 अपाचे हेलिकॉप्टर्सचा पुरवठा केला आहे.

1984 मध्ये पहिल्यांदा अमेरिकेच्या सैन्यादलात या हेलिकॉप्टरला सामिल करण्यात आले.

सध्या भारत रशियाने तयार केलेली एमआय 35 हेलिकॉप्टर्सचा वापर करत आहे. परंतु आता ही हेलिकॉप्टर्स सेवेतून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहेत.

शत्रूच्या सीमेत घुसुन हल्ला करण्याच्या दृष्टीने या हेलिकॉप्टरचे डिझाइन करण्यात आले आहे.

इस्त्रायलदेखील लेबनान आणि गाझा पट्ट्यात आपल्या सैनिकी कारवायांदरम्यान या हेलिकॉप्टरचा वापर करतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 3, 2019 11:02 am

Web Title: eight apache helicopters joins the indian air force sas 89
Next Stories
1 पोटदुखीवर कंडोम वापरण्याचा सल्ला देणाऱ्या डॉक्टरवर सरकारने केली कारवाई
2 युद्धाची सुरूवात पाकिस्तान कधीही करणार नाही : इम्रान खान
3 दिल्ली : चार मजली इमारत कोसळून एक ठार ; आणखी काही जण अडकल्याची भिती
Just Now!
X