उत्तराखंडमधील खटिमा जिल्ह्यात दगडांनी भरलेली एक आठ डब्ब्यांची मालगाडी यमदूत बून रेल्वे रुळांवर धावली आहे. मालगाडीचे आठ डबे टनकपूरहून इंजिनाशिवाय अर्धा तास रेल्वे रुळांवरुन जवळपास ३० किलोमीटर सुसाट धावत गेले. या गाडीचा वेग अंदाजे ८० ते १०० किलोमीटर प्रतितास होता. या मालगाडीचा वेग इतका जास्त होता की, तिच्या धडकेमुळे काही पशूंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

मालगाडी सुसाट वेगाने रेल्वेरुळांवर धावत असताना त्यांनी एका ट्रॅक्टरला धडक दिली. मालगाडीच्या वेगामुळे एक ट्रॅक्टर सात किलोमीटर अंतरापर्यंत ढकलत गेला. खटिमा स्थानकापासून १०० मीटर अंतर गेल्यावर मालगाडी रेल्वे रुळांच्या जवळ असलेल्या एका ट्रॉलीला जाऊन आदळली. त्यामुळे पहिल्या डब्ब्याची दोन चाके रुळांवरुन घसरली आणि मालगाडी थांबली. या अपघातामुळे एक मोठा अनर्थ टळला.

रेल्वेच्या इज्जतनगर बरेली विभागातून ९ जुलै रोजी दुपारी दोन वाजता एक मालगाडी रेल्वे रुळांचे रुंदीकरण (ब्रॉडगेज) करण्याच्या कामासाठी दगड आणण्यासाठी टनकपूरला पोहोचली होती. मंगळवारी टनकपूर स्थानकाजवळ मालगाडीतील आठ डब्ब्यांमध्ये दगड भरण्यात आले होते. याचवेळी सकाळी १०.४५ च्या सुमारास जेसीबीच्या मदतीने मालगाडीत दगड भरण्यात येते होते. रेल्वे रुळांना उतार असल्याने मालगाड्यांचे डबे रेल्वे रुळांवरुन धावू लागले. उतार तीव्र असल्याने हळूहळू मालगाडीने वेग घेतला.

इंजिनाशिवाय मालगाडी सुसाट वेगाने धावत असल्याची माहिती टनकपूर स्थानकाचे अधीक्षक के. डी. कापडी यांनी बनबसा, चकरपूर व खटिमा स्थानकांसोबतच बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे रेल्वे रुळांजवळ काम करणारे शेकडो कर्मचारी रेल्वे रुळांपासून लांब गेले. यानंतर अनेक ठिकाणांजवळील रेल्वे क्रॉसिंग बंद करण्यात आले. यमदूत बनून धावत असलेल्या मालगाडीने चकरपूरजवळ रेल्वे रुळांच्या कामासाठी ट्रॅक्टरलादेखील धडक दिली. यावेळी ट्रॅक्टरच्या चालकाने उडी मारुन स्वत:चा जीव वाचवला.