हवालातून आलेले दोन कोटी चुकून विवरणपत्रात

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या (आप) निवडणूक निधी विवरणपत्रात अनेक त्रुटी असून, मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात तो पक्ष अपयशी ठरला आहे, त्यामुळे कारवाई करण्यात येऊ शकते, असा इशारा निवडणूक आयोगाने कारणे दाखवा नोटीस पाठवून दिला आहे. मात्र  लेखा तपासणीतील महत्त्वाच्या बाबीच निवडणूक आयोगाला ज्ञात नाहीत व केंद्रीय संस्था म्हणून ते पक्षपातीपणे आमच्या विरोधात कारवाईचा इशारा देत आहेत, असे आम आदमी पक्षाने म्हटले आहे. आम आदमी पक्षाने हवाला मार्गाने मिळालेले दोन कोटी रुपये स्वेच्छा देणगी म्हणून दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.

निवडणूक आयोगाने या पक्षाला कारणे दाखवा नोटीस पाठवली असून त्यात म्हटले आहे, की हवाला मार्गाने आलेला पैसा पक्षाने स्वेच्छा देणगी म्हणून दाखवला आहे. आम आदमी पक्षाने या नोटिशीला वीस दिवसांत उत्तर द्यावे अन्यथा केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडे उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे कारवाई करण्यात येईल. निवडणूक चिन्ह नियम १६ ए अन्वये निवडणूक आयोग पक्षाची मान्यता काढून घेऊ शकतो. दिल्लीत आम आदमी पक्षाला निवडणूक आयोगाची मान्यता आहे. नोटिशीत म्हटले आहे, की त्या पक्षाने २०१४-१५ मधील मूळ देणगी अहवाल सादर केला असून तो ३० सप्टेंबर २०१५ रोजी प्राप्त झाला. नंतर पक्षाने २० मार्च २०१७ रोजी सुधारित अहवाल सादर केला. मूळ अहवालात २६९६ देणगीदार असून एकूण देणगी ३५४५४४६१८ रुपये आहे व सुधारित अहवालात देणगीदार ८२६४ असून त्यात रक्कम ३७६०६२६३१ दाखवली आहे. निवडणूक आयोगाने म्हटले आहे, की प्रत्यक्ष कर मंडळाकडून जो अहवाल प्राप्त झाला आहे त्यात आम आदमी पक्षाने २०१४-१५ या वर्षांत मिळालेल्या काही देणग्या लपवल्या आहेत. पक्षाने ६७.६७ कोटी जमा दाखवली असून त्यात ६४.४४ कोटींच्या देणग्या आहेत.