निर्धारित वेळेत निवडणूक खर्चाची कागदपत्रे जमा न केल्याने निवडणूक आयोगाने वीस राजकीय पक्षांना नोटीस दिली असून त्यात काँग्रेस, भाजप, आम आदमी पक्ष यांचा समावेश आहे.
आयोगाने या पक्षांना इशारा दिला आहे, की पंधरा दिवसांत लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या खर्चाचा तपशील दिला नाही, तर त्यांची मान्यता काढून घेण्यात येईल.
राजरीय पक्षांना आता खर्चाची कागदपत्रे सादर न केल्याने त्यांचे लक्ष  निवडणूक आयोग चिन्हे (आरक्षण व वितरण) आदेश १९६८ कलम १६ ए कडे वेधले आहे. तेलंगण राष्ट्रीय समिती, समाजवादी पक्ष, हरयाना जनहित काँग्रेस, झोराम नॅशनॅलिस्ट पार्टी, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, नॅशनल पीपल्स पार्टी, पीपल्स डेमोक्रॅटिक अलायन्स, मणिूपर स्टेट काँग्रेस पार्टी, केरळ काँग्रेस मणी, कर्नाटक जनता पक्ष, झारखंड मुक्ती मोर्चा, पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल, आसाम गण परिषद, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, क्रांतिकारी समाजवादी पक्ष, ऑल इंडिया एन.आर.काँग्रेस यांना या नोटीस देण्यात आल्या आहेत. नियमानुसार  विधानसभा निवडणुका झाल्यानंतर ७५ दिवसांत व लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ९० दिवसांत खर्च सादर करणे अपेक्षित असते. निवडणूक आयोगाने यापूर्वी २२ ऑक्टोबरलाही याची पक्षांना पत्राने जाणीव करून दिली होती.