केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना एक महत्वाचा आदेश दिला आहे. सीआरपीएफच्या जवानांना कमीत कमी १०० दिवस आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवता येईल अशापद्धतीने त्यांची नियुक्त करा असं शाह यांनी सांगितले आहे.

२३ सप्टेंबर रोजी अमित शाह यांनी पोलीस टू डिव्हिजनची कामे काय असतात यासंदर्भात झालेल्या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रेझेंटेशनदरम्यान त्यांनी या सूचना केल्या. या प्रेझेंटेशनमध्ये केंद्रीय सुरक्षादलाच्या जवानांची नेमणूक दिर्घकाळासाठी घरापासून दूरवर केल्यास त्यांना काय काय त्रास होतो यासंदर्भात भाष्य करण्यात आले होते. शाह यांनी एक सॉफ्टवेअर निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने वेगवेगळ्या ठिकाणी नियुक्त करण्यात येणाऱ्या जवानांची सर्व माहितीचा आढावा घेतला जाईल. या माहितीच्या आधारे त्यांची नियुक्ती अशापद्धतीने केली जाईल की त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर महिन्यातले कमीत कमी शंभर दिवस तरी एकत्र राहता येईल. सध्या वापरण्यात येणाऱ्या लेखी नियुक्तीपेक्षा या सॉफ्टवेअरच्या मदतीने कोणत्या जवानाला कुठे नियुक्त करावे हे अगदी सोप्या पद्धतीने ठरवता येईल.

केंद्रीय गृहमंत्रालयाने सीमा सुरक्षा दल (बीएसएफ), सीआरपीएफ, इंडो तिबेटीयन पोलिस दल (आयटीबीपी), राष्ट्रीय सुरक्षा दल (एनएसजी), सीमा सुरक्षा दल (एसएसबी), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) आणि आसाम रायफल्सच्या महासंचालकांना पत्र लिहून यासंदर्भातील सूचना केल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी करण्यासाठी पावले उचलण्याचे आदेश यामध्ये देण्यात आले आहेत.

सीआरपीएफने दिलेल्या माहितीनुसार सीआरपीएफच्या जवानांना अंदाजे आपल्या कुटुंबाबरोबर ७५ ते ८० दिवस मिळतात. यामध्ये ६० पगारी रजा आणि १५ कॅज्यूअल लिव्ह्सचा समावेश आहे. तसेच पहिल्या दोन मुलांच्या जन्मासाठी जवानांना १५ दिवसांची पॅटर्नल लिव्ह (पालकत्वासाठी रजा) मिळण्याची तरतूद आहे.

“शाह यांनी दिलेल्या सूचना अंमलात आणल्यास जवानांना त्यांच्या कुटुंबांबरोबर अधिक वेळ घालवता येईल. यामुळे जवानांना खूप फायदा होणार असून त्यांना अनेक कौटुंबिक समारंभांना उपस्थित राहता येणार आहे. तसेच या निर्णयामुळे जवानांना प्रेरणा मिळेल आणि सरकार आपल्याबद्दल विचार करतेय अशी भावना त्यांच्या मनात निर्माण होईल,” असे मत एका अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.