कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थात ईपीएफओने सामायिक सेवा केंद्राच्या (कॉमन सर्व्हिस सेंटर- सीएससी) माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा स्थगित केल्या आहेत. डेटा सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे ईपीएफओेने स्पष्ट केले आहे. मात्र, यामुळे वापरकर्त्यांनी घाबरुन जाऊ नये, डेटा सुरक्षित असल्याचे ईपीएफओने म्हटले आहे.

इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या सीएससीतर्फे संचालित aadhaar.epfoservices.com या वेबसाईटवरील वापरकर्त्यांचा डेटा हॅकर्सनी चोरल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते. यापार्श्वभूमीवर ईपीएफओने बुधवारी स्पष्टीकरण दिले. माहितीची सुरक्षा करण्याच्या उद्देशाने सामायिक सेवा केंद्राच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. सामायिक सेवा केंद्रांची सुरक्षा भेदली जाऊ शकते का, याचा तपास पूर्ण होईपर्यंत या सेवा बंद असतील, असे ईपीएफओने म्हटले आहे. मात्र, वापरकर्त्यांचा डेटाची चोरी झालेली नाही. त्यामुळे वापरकर्त्यांनी घाबरु नये, असे आवाहन ईपीएफओने केले आहे.