भारतातील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रांच्या (ईव्हीएम) साहाय्याने ‘घोटाळा’ करण्यात आल्याचा खळबळजनक दावा करणारा हॅकर सय्यद शुजा हा पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय किंवा दहशतवादी संघटना ISIS चा हस्तक असू शकतो अशी शक्यता केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी वर्तवली आहे. तसंच त्यांनी काँग्रेसवर देखील गंभीर आरोप करत, त्यांचा लोकशाही संपवण्याचा प्रयत्न आहे असं म्हटलंय.

‘सय्यद शुजा हा आयएसआय किंवा ISIS चा हस्तक असू शकतो. भारताची लोकशाही कमकुवत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तान आणि चिनचा अॅजेंडा काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांच्या देखरेखीखाली राबवला जातो हे भयावह आहे. सत्तेतून बाहेर गेल्यामुळे काँग्रेसला देशातील लोकशाही संपवायची आहे. आम्ही यापूर्वीही आणीबाणी पाहिली आहे’, असा गंभीर आरोप गिरीराज सिंह यांनी ट्विटरद्वारे केला आहे.


इंडियन जर्नालिस्ट्स युनियनने (युरोप) आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत सय्यद शुजा या हॅकरने ईव्हीएममध्ये हेराफेरी करता येऊ शकते, असा दावा केला होता. २०१४च्या लोकसभा निवडणुका पारदर्शक झाल्या नव्हत्या, असा आरोपही शुजाने केला होता. या पत्रकार परिषदेत शुजा स्काइपच्या माध्यमातून पडद्यावर झळकला असला, तरी त्याचा चेहरा झाकण्यात आला होता. ईव्हीएमचे डिझाइन तयार करून ती विकसित करणाऱ्या इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (ईसीआयएल) या सार्वजनिक उपक्रमातील एका चमूचा आपण भाग होतो, असा दावा त्याने केला होता. हा घोटाळा रोखणाऱ्या आपल्या चमूतील काही सदस्यांची हत्या करण्यात आल्यामुळे भीती वाटून २०१४ साली आपण भारतातून पळून आल्याचे त्याने म्हटले होते.