01 March 2021

News Flash

पीएम केअर फंडाचा हिशोब द्या; १०० निवृत्त सनदी अधिकाऱ्यांचं पंतप्रधान मोदींना पत्र

फंडाच्या पारदर्शकतेवर उपस्थित केले सवाल

संग्रहित छायाचित्र/इंडियन एक्स्प्रेस

करोना काळात उपाययोजना आणि मदतीसाठी निर्माण करण्यात आलेल्या पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेबद्दल विरोधी पक्षांकडून शंका उपस्थित केल्या जात आहे. त्यातच आता १०० सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवलं आहे. पीएम केअर फंडाच्या पारदर्शकतेवर अधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले असून, जमा झालेला निधी आणि खर्च यांचा हिशोब सार्वजनिक करण्याची मागणी अधिकाऱ्यांनी केली आहे.

एस.सी. बेहर, के. सुजाता राव आणि ए. एस. दुलत यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या या पत्रात पीएम केअर फंडाबद्दल अनेक प्रश्न निर्माण झाले असल्याचं म्हटलं आहे. “पीएम केअर फंड आरटीआय कायदा २००५ च्या नियम २ (एच) नुसार सार्वजनिक प्राधिकरण नाहीये. जर हे सार्वजनिक प्राधिकरण नाही, तर पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री आणि अर्थमंत्री हे पीएम केअर फंडचे सदस्य कसे आहेत? त्यांची पदं आणि अधिकारीक स्थान उधारीवर देण्यात आलं आहे का? मंत्री असताना ते विश्वस्त का आहेत?, असा सवाल अधिकाऱ्यांनी या पत्रातून पंतप्रधान मोदी यांना केला आहे.

“पीएम केअर फंडाच्या प्रत्येक गोष्टीत पारदर्शकतेचा अभाव आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांचा सामना करताना राज्यांची सरकारं त्रस्त झाली होती. त्यांना आर्थिक मदतीची गरज होती आणि अजूनही आहे,” असंही या अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटलं आहे. पीएम केअर फंडात किती निधी जमा झाला आणि किती खर्च करण्यात आला, याचा हिशोब सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे.

करोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारनं साहित्य खरेदी आणि उपाययोजना राबवण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय आपत्ती मदत कोषाशिवाय स्वतंत्र पीएम केअर फंड निर्माण केला होता. या फंडात जमा केली जाणारा पैशाला आयकरातून सूट देण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले होते. संसदेतही यावरून बराच गदारोळ झाला होता. आता सेवानिवृत्त सनदी अधिकाऱ्यांनीच फंडाच्या पारदर्शकतेवर सवाल केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2021 9:12 am

Web Title: ex bureaucrats flag clear lack of transparency in pm cares fund open letter to prime minister modi bmh 90
टॅग : Coronavirus
Next Stories
1 भयंकर दुर्घटना : प्रवाशांनी भरलेल्या बसमध्ये आगीचा भडका, सहा जणांचा होरपळून मृत्यू
2 अमेरिकेत शंभर दिवसांत १० कोटी लोकांचे लसीकरण
3 ‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान -जावडेकर
Just Now!
X