हिंडाल्को कंपनीला ओडिशात कोळसा खाणी दिल्याच्या प्रकरणात सीबीआयने आकसाची वागणूक दिली असा आरोप माजी कोळसा सचिव पी. सी. पारख यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाला प्रभावित करण्यासाठी त्यांनी आपल्या विरोधात कारवाई केली पण त्या कटात सामील असलेले व निर्णय घेणारे पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर कारवाई केली नाही असेही ते म्हणाले. कुठल्याही निर्णयात सचिव फक्त सूचना करतात. अंतिम निर्णय मंत्री किंवा पंतप्रधानांचा असतो असे त्यांनी म्हटले आहे. पारख यांनी असे सांगितले की, पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणी कुठल्या एखाद्या कंपनीला अनुकूलता दाखवण्यासाठी दडपण आणले नव्हते.
पारख यांच्या क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर.. कोलगेट अँड अदर ट्रथस या पुस्तकात म्हटले आहे की, सीबीआयने सुडाच्या भावनेने कारवाई केली व नोकरशहांना सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या प्रश्नांना जाहीर मंचावर आणले. असल्या प्रकरणांमध्ये राजकीय नेते नामानिराळे राहतात. सिन्हा यांनी तथ्य, नियम व कायदे समजून न घेता कारवाई केली. कदाचित त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला प्रभावित करण्यासाठी ही कारवाई केली होती, कारण त्यांना पिंजऱ्यातून स्वातंत्र्य मिळाले होते, त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला पिंजऱ्यातला पोपट असे म्हटले होते.