परीक्षेला घाबरू नका, तर स्वत:त सुधारणा करण्याची संधी म्हणून तिच्याकडे पाहा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विद्यार्थ्यांना केले. सामाजिक आणि कौटुंबिक वातावरण कधीकधी विद्यार्थ्यांवर दडपण आणते, हे योग्य नसल्याचेही ते म्हणाले.

‘परीक्षा पे चर्चा २०२१’ या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी दूरचित्र माध्यमाद्वारे संवाद साधला. परीक्षेचा तणाव, त्याचे व्यवस्थापन, विद्यार्थ्यांशी पालक आणि शिक्षकांची वागणूक इत्यादी अनेक विषयांवर मोदी यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थी-पालक-शिक्षकांनी विचारलेल्या अनेकविध प्रश्नांनाही मोदी यांनी उत्तरे दिली.

हा कार्यक्रम पंतप्रधान आणि पंतप्रधान कार्यालयाच्या सर्व समाजमाध्यमांवर थेट प्रसारित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी १३ लाखांहून अधिक शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी नोंदणी केली होती. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रथमच सर्व जगातील इच्छुकांना निमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना त्यांच्या मनातील भीती, आकांक्षा, चिंता आणि सूचनांबाबत पंतप्रधानांशी चर्चा करण्याची संधी देण्यात आली होती.

करोना महासाथीचे हे वर्ष विद्यार्थ्यांनी काय म्हणून स्मरणात ठेवावे, असा प्रश्न अहमदाबाद येथील एका विद्यार्थ्याने विचारला. त्यावर मोदी म्हणाले, विद्यार्थ्यांना मोठ्या अचडणींना तोंड द्यावे लागले. शिक्षक, मित्रांशी संवाद साधण्याची आणि आठवणी निर्माण करण्याची जागा आहे. मात्र, आपण या वर्षात करोनापूर्व काळातील आपले जीवन हरवून बसलो, अशी खंत मोदी यांनी व्यक्त केली.

प्रश्नपत्रिका पाहिल्यावर आपण प्रश्नांची उत्तरे का विसरतो, या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना मोदी म्हणाले की तणावमुक्त राहा आणि सर्व तणाव बाहेर ठेवून परीक्षा केंद्रात प्रवेश करा. तणावाशी सामना कसा करायचा, याचे उत्तर ‘एक्झाम वॉरियर’ या पुस्तकात आहे.

विद्यार्थ्यांना सूचना

* तुमच्या आसपासच्या गोष्टींचे निरीक्षण करा आणि त्यातून शिका. स्वप्न पाहा, तुम्ही पाहिलेल्या एका स्वप्नाचा विचार करा, तुमची दृष्टी स्पष्ट होईल.

* तणावमुक्त राहा आणि सर्व तणाव बाहेर ठेवून परीक्षा केंद्रात प्रवेश करा.

* कविता आणि लेखनातून तुमच्या भावना आणि विचारांना वाट करून द्या.

पालकांना सल्ला

* तुम्ही तुमच्या मुलांच्या पिढीच्या चर्चांमध्ये रस दाखवालात तर तुम्ही त्यांच्या आनंदात गुंतून जाल. मग दोन पिढ्यांतील अंतरही नष्ट होईल.

* मुलांमध्ये भीती निर्माण करू नका. मुले हुशार असतात, त्यांच्यावर मूल्ये लादण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्याप्रमाणे आयुष्य जगण्याची अपेक्षा त्यांच्याकडून ठेवू नका.