जम्मू काश्मीरमधील नागरोटामध्ये भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्यातील पाच जवान आणि दोन अधिकारी असे सात जण शहीद झाले. तर तीन दहशतवाद्यांचा  या चकमकीत खात्मा करण्यात आला.

मंगळवारी पहाटे ५.३० च्या सुमारास दहशतवाद्यांनी नागरोटामध्ये सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर भारतीय जवानांनी प्रत्तुत्तर देण्यास सुरुवात केली. दहशतवाद्यांचा नागरोटामधील लष्करी छावणीवर हल्ल्याचा प्रयत्न होता. पण त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यांनी तळाजवळील ऑफिसर्स मेसच्या इमारतीमध्ये प्रवेश केला. या इमारतीमध्ये १२ जवान, दोन महिला आणि त्यांची लहान मुले होती. त्यामुळे परिस्थिती बिकट झाली होती. पण या सर्वांची सुखरुप सुटका करण्यात आली.  तिन्ही दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यांच्याकडे शस्त्रास्त्रांचा पुरेसा साठादेखील होता. पहाटे साडे पाचपासून सुरु असलेली चकमक संध्याकाळपर्यंत सुरु होती.

नागरोटा परिसर व्यूहनितीच्या दिशेने अतिशय महत्त्वाचा आहे. लष्कराचे लेफ्टनंट जनरल दर्जाचे अधिकारी नागरोटातील तळावर उपस्थित असतात. त्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य खूप मोठे आहे. नागरोटा भागातून श्रीनगरला जाणारा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने हा भाग महत्त्वपूर्ण आहे.

याशिवाय सांबामधील चमियालजवळील लष्काराच्या चौकीजवळ संशयास्पद हालचाली दिसून आल्या आहेत. यानंतर सीमा सुरक्षा दलाने संपूर्ण परिसर ताब्यात घेतला होता. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या भागातील सर्व शाळादेखील बंद ठेवण्यात आल्या होत्या.