संसद भवन संकुलाच्या परिसरातील सुरक्षेसाठी निमलष्करी दलांचे विशेष प्रशिक्षण दिलेले कमांडो पथक तैनात करण्यात आले आहे. या पथकाला अत्याधुनिक उपकरणे व शस्त्रेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलातील उत्तम प्रशिक्षित स्त्री व पुरुषांचा या पथकात समावेश आहे. २००१ मध्ये संसदेवर जो हल्ला झाला होता, त्यानंतर असे पथक स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. ही योजना आता पूर्णत्वास गेली आहे. संसद भवनाच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या या विशेष कमांडो पथकात केंद्रीय राखीव पोलिस दल व दिल्ली पोलिस दलातील प्रशिक्षित जवानांचा समावेश केला असून त्यात एकूण १५४० जणांचा समावेश आहे. त्या सर्वानी कमांडो प्रशिक्षण पूर्ण केलेले असून त्यांना आपत्कालीन स्थितीत आण्विक व जैव रासायनिक हल्ल्यात कसे तोंड द्यायचे याचेही प्रशिक्षण दिले आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दलाचे महानिरीक्षक ए.पी.माहेश्वरी यांनी सांगितले, की हे कमांडो पथक तैनात करण्यात आले असून त्यातील जवानांकडे सुरक्षा आव्हानांना तोंड देण्याचे कौशल्य आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने याविषयीच्या प्रस्तावास गेल्या एप्रिलमध्ये मंजुरी दिली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 6, 2013 12:29 pm