दक्षिण आफ्रिकेमध्ये वास्तव्याला असताना म. गांधीजी आणि वास्तुस्थापत्य हर्मन कॅलनबाख यांच्यातील संबंधांवर प्रकाशझोत टाकणारी आणि दोन्ही कुटुंबीयांमध्ये असलेला स्नेह उघड करणाऱ्या ७५ दुर्मीळ पत्रांचा ठेवा जनतेसाठी बुधवारी खुला करण्यात आला.
दोन वृत्तपत्रे आणि जर्नलमधील ही पत्रे इंग्लंडमधील लिलावगृहातून १.२८ दशलक्ष डॉलर किंमत मोजून आणण्यात आली असून आता ती राष्ट्रीय पुरातत्त्व विभागाकडे आहेत. ‘गांधी-कॅलनबाख पेपर्स’ या नावाने एक प्रदर्शन भरविण्यात आले असून त्याचे उद्घाटन सांस्कृतिक मंत्री चंद्रेशकुमारी कटोच यांच्या हस्ते करण्यात आले. सदर प्रदर्शन १५ फेब्रुवारीपर्यंत खुले राहणार आहे.
एकूण १५०० पत्रांपैकी ७५ पत्रेच प्रदर्शनात ठेवण्यात आली असून त्यावरून दक्षिण आफ्रिकेतील पहिला सत्याग्रह आणि दोन कुटुंबांतील आंतरिक स्नेह त्यामधून प्रतिबिंबित होत आहे. म. गांधीजींच्या पुत्राने कॅलनबाख यांचा उल्लेख ‘कॅलनबाख काका’ असा केला असल्याची बाबही पत्रांमधून स्पष्ट होत आहे. इतकेच नव्हे तर कॅलनबाख यांचे बंधू सायमन आणि त्यांची पुतणी हॅना लेझर यांच्याशी असलेल्या संबंधांवरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीबाबतची आणि म. गांधीजींच्या प्रकृतीची माहिती गांधी कुटुंबीयांकडून वेळोवेळी कॅलनबाख यांना देण्यात येत होती, असेही या पत्रांवरून स्पष्ट होत आहे. गांधीजी आणि कॅलनबाख यांची दक्षिण आफ्रिकेत मैत्री कशी जुळली आणि वर्षांनुवर्षे ती कशी टिकली तेही या पत्रांमधून स्पष्ट होत आहे.
या पत्रांसमवेतच २८७ छायाचित्रे आणि स्मृती जतन करणाऱ्या वस्तूही ठेवण्यात आल्या असून त्यावरून कॅलनबाख यांच्या दैनंदिन आयुष्यावर गांधीजींचा कसा पगडा होता तेही स्पष्ट होत आहे.