अमेरिकेतील भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक करण्यात आल्याच्या कृत्यास जशास तसे उत्तर देण्यासाठी भारताने अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याची हकालपट्टी केली होती़  त्यामुळे आता या राजनैतिक अधिकाऱ्याने केलेल्या अपमानास्पद वक्तव्याशी आपला संबंध नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आह़े
या राजनैतिक अधिकाऱ्याची वक्तव्ये अमेरिकी शासनाच्या धोरणांशी संबंधित नाहीत़  तसेच ही वक्तव्ये अमेरिकी शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरूनही प्रसारित करण्यात आलेली नाहीत, असेही अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या उपप्रवक्त्या मेरी हार्फ यांनी पत्रकार परिषदेत सांगितल़े  व्यक्तिगततेच्या कारणास्तव हार्फ यांनी गेल्या आठवडय़ात भारताकडून हकालपट्टी करण्यात आलेल्या अमेरिकी अधिकाऱ्याचे नाव जाहीर करण्यास नकार दिला़  परंतु, भारतातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्या अधिकाऱ्याचे नाव वायन मे असे असून त्यांनी राजनैतिक अधिकारी असलेली पत्नी अ‍ॅलिसिया मुल्लर मे हिच्यासह भारत सोडला आह़े
या अधिकारी दाम्पत्याने त्यांच्या फेसबुक खात्यावरून भारताबद्दल आणि भारतीय संस्कृतीबद्दल अपमानास्पद विधाने केली आहेत़  परंतु, अशी कोणतीही विधान आपण फेसबुकवर पाहिली नसल्याचे हार्फ यांनी सांगितल़े  तसेच तशी विधान असल्यास त्यांच्याशी शासनाचा काहीही संबंध नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आह़े