पाळीव प्राणी हे माणसाला भावनिक सुरक्षितता देतात व त्यांच्या सहवासाने दिलासाही मिळतो. अलीकडेच ब्रिटनमध्ये परीक्षा देऊन आलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा म्हणून पपीरूम्सची व्यवस्था करण्यात आली होती. आता कालांतराने पाळीव प्राण्यांची जागा यांत्रिक पाळीव प्राणी घेतील अशी चिन्हे आहेत. तंत्रज्ञानाच्या मदतीने २०२५ पर्यंत  हे शक्य होईल. जास्त लोकसंख्या घनता असलेल्या शहरांकडे लोक स्थलांतरित होत आहेत, त्यांना या पाळीव प्राण्यांचा उपयोग होईल असे वैज्ञानिकांचे मत आहे.
मेलबर्न विद्यापीठाचे पशु कल्याण संशोधक डॉ. जीन लूप रॉल्ट यांनी सांगितले की, या यांत्रिक पाळीव प्राण्यांना ‘रोबोपेट्स’ म्हटले जाते व ते आभासी पाळीव प्राण्यांपेक्षा वेगळा अनुभव देतील. गर्दीच्या शहरांमध्ये प्राणी पाळणे ही चैनीची बाब ठरणार आहे व त्यासाठी आता पाळीव प्राण्यांची नक्कल करणाऱ्या चिप्स व सर्किट्स म्हणजेच रोबोपेट्स हा उपाय ठरेल. पुढील पिढीसाठी ती नित्याचीच बाब राहील.
अगदी वीस वर्षांपूर्वी कुणी फेसबुकची कल्पना केली नसेल, पण आज ते अस्तित्वात आहे. तीच स्थिती रोबोपेट्सच्या बाबतीत आहे. जपानमध्ये रोबोट कुत्र्यांशी लोकांचे भावबंध छान जुळले आहेत, असे रॉट यांचे म्हणणे आहे. पाळीव प्राणी रोबोटिक्सच्या मदतीने तयार करणे ही जपानमध्ये जुनी बाब आहे. १९९० पासून तेथे असे रोबोट कुत्रे पाळले जातात. आगामी काळात प्राण्यांशी आपले भावबंध कसे असतील यावर तंत्रज्ञान प्रभाव टाकणार आहे. पेट रोबोटिक्समध्ये बरेच संशोधन झाले आहे. गुगलवर सर्च दिलेत तर रोबोट डॉग्ज म्हणजे यांत्रिक कुत्र्यांच्या निर्मितीवर अनेक पेटंट घेतलेली दिसतात. यांत्रिक प्राण्यांना मोठी बाजारपेठ येत्या १० ते १५ वर्षांंत मिळणार आहे.
यांत्रिक पाळीव प्राण्यांचे काही फायदे-तोटे आहेत. प्राण्यांमुळे होणारी अ‍ॅलर्जी या प्राण्यांमुळे होणार नाही, ते कमी जागेत राहू शकतील, त्यांना सोबतीला रूग्णालयातही नेता येईल; पण यात काही नैतिक प्रश्नही आहेत. यांत्रिक पाळीव प्राणी माणसाला भावनिक सुरक्षितता काही प्रमाणात देतील असे म्हटले तर खऱ्या पाळीव प्राण्यांबरोबर आपले जे भावबंध जुळतात ते खरे असतात की, आपणच लादलेले आभास असतात असा प्रश्न निर्माण होतो. पाळीव प्राण्यांची आपल्याला काळजी घ्यावी लागते, त्यांना अन्न-पाणी द्यावे लागते, कृत्रिम किंवा यांत्रिक पाळीव प्राण्यांना यातले काहीच द्यावे लागणार नाही त्यामुळे कुणाची तरी काळजी घेण्याची माणसाची सवयच निघून जाईल अशी भीती रॉल्ट व्यक्त करतात. ‘फ्रंटियर्स इन व्हेटरनरी सायन्स’ या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

यांत्रिक पाळीव प्राण्यांचे फायदे
*  कमी जागेत राहू शकतील.
*  त्यांची काळजी घ्यावी लागणार नाही.
*  त्यांच्यापासून अ‍ॅलर्जीची भीती नाही.
*   ते तुमच्यावर प्रेम करतील, आज्ञा पाळतील.