सोशल मीडियात संवादाचे लोकप्रिय साधन असलेल्या फेसबुकने आपली महत्त्वाकांक्षी इंटरनेट डॉट ओराजी सेवा भारतात काही महिन्यांपूर्वी सुरू केली. फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने आपल्या फेसबुक अकाऊंटवर इंटरनेट डॉट ओराजी सेवेमुळे फायदा झालेल्या एका व्यक्तीची माहिती देऊन या सेवेच्या उपयोगाबद्दल छोटेखानी लेख शुक्रवारी पोस्ट केला. विशेष म्हणजे, झकरबर्गच्या या पोस्टने महाराष्ट्रातील नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. झकरबर्गने आपल्या लेखात इंटरनेट डॉट ओआरजी सेवेचा लाभ घेतलेल्या महाराष्ट्रातील एका सोयाबीन शेतकऱयाचे उदाहरण दिले आहे. असिफ मुजावर या महाराष्ट्रातील सोयाबीन शेतकऱयाला दोन मुली आहेत. फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआरजी या सेवेतून असिफ यांना बेबी सेंटर या अॅपचा मोफत वापर करता आला. बेबी सेंटर या अॅपच्या माध्यमातून असिफ यांना आपल्या दोन मुलींचे स्वास्थ कसे राखावे यावर तज्ञांचा सल्ला घेता आला. त्यामुळे फेसबुकच्या या सेवेमुळे भरपूर फायदा झाल्याचे असिफने म्हटल्याचे झकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. ठराविक अॅप्ससाठी मोफत इंटरनेट उपलब्ध करून देणाऱया फेसबुकच्या इंटरनेट डॉट ओआरजी या सुविधेवर देशात काही स्तरांतून टीका केली गेली. मात्र, जगभरात फेसबुकच्या या सुविधेला नेटिझन्सकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा फेसबुकने केला आहे.
जगभरातील लाखो लोक आरोग्यविषयक सल्ल्यांसाठी इंटरनेट डॉट ओराजीच्या सुविधेचा वापर करीत असून ही सुविधा जगातील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे झकरबर्गने सांगितले आहे. तसेच या सुविधेमुळे बेबी सेंटर आणि ममा हे अॅप जगातील ३० लाख ४० हजार लोकांपर्यंत पोहोचले. हे इंटरनेट डॉट ओराजी या सेवेमुळेच शक्य झाल्याचेही झकरबर्ग पुढे म्हणाला. इंटरनेट डॉट ओआरजी या सेवेअंतर्गत मोफत वापरता येणाऱया अॅप्सची ‘फ्री बेसिक अॅप्स’ अशी वर्गवारी करण्यात आली आहे. आगामी काळात त्यात जास्तीत जास्त अॅप्सचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून या सेवेत तीन महत्त्वपूर्ण बदल करणार असल्याचेही झकरबर्गने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.