कोणाचं नशीब कधी, कसं चमकेल सांगता येत नाही. मध्य प्रदेशातील शेतकरी लखन यादव त्याचे उत्तम उदहारण आहे. लखन यादवला नशीबाने अशी काही साथ दिली की, तो आज लखपती आहे. मध्य प्रदेशातील पन्ना हे ठिकाण हिऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या खाणींमध्ये हिरे सापडतात. मागच्या महिन्यात लखन यादव या शेतकऱ्याने पन्नामध्ये २०० रुपये भाडयावर १० बाय १० जमिनीचा एक छोटा तुकडा घेतला होता. तिथे खोदकाम करताना त्याला १४.९८ कॅरेटचा हिरा सापडला.

“त्या हिऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं. हिरा नजेरला पडला तो, क्षण मी कधीच विसरु शकत नाही. खोदकाम करताना दगडांमध्ये विलक्षण चमकणारी एक वेगळी वस्तू दिसली” असे लखन यादवने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.
लखपती झाल्यानंतर आता कसे वाटते? या प्रश्नावर लखन यादव म्हणाले की, “काही तरी मोठे मिळेल म्हणून मी गेलो नव्हतो. माझे शिक्षण झालेले नाही. माझ्या चार मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी मी हे पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवणार आहे.”

पन्ना नॅशनल पार्कमधून गाव हटवण्यात आली, त्यामध्ये लखन यादवचंही गाव होतं. भरपाई म्हणून त्याला जे पैसे मिळाले, त्यातून त्याने दोन हेक्टर जमीन, दोन म्हशी विकत घेतल्या. हिरा सापडल्यानंतर त्याला तो जिल्हा प्रशासनाकडे जमा करावा लागला. त्यावेळी त्याला एक लाख रुपये मिळाले, त्यातून त्याने बाईक विकत घेतली.

लखन यादवने खोदकामासाठी जी जमीन भाडयावर घेतलीय, तिथे तो पुन्हा खोदकाम सुरु करणार आहे. तिथे आणखी एखादा हिरा सापडू शकतो, असे त्याला वाटते. लखन यादवला पन्नाच्या खाणीत सापडलेला हिरा शनिवारी लिलावामध्ये ६०.६ लाख रुपयांना विकला गेला.