नवे कृषी कायदे मागे घेण्यावर शेतकरी ठाम आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलनही करत आहेत. अनेकदा शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चा करण्यात आली. परंतु त्या चर्चांमधून कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, उद्या शेतकरी ज्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्या ठिकाणी उपोषणला बसणार असल्याची माहिती स्वराज अभियानचे नेते योगेंद्र यादव यांनी दिली. तसंच शेतकरी नेते जगजीत सिंग यांनी हरयाणाचे शेतकरी २५ ते २७ डिसेंबरदरम्यान टोलही देणार नसल्याची माहिती दिली.

२३ डिसेंबर रोजी शेतकरी दिवस साजरा करण्यात येतो. परंतु यावेळी शेतकरी दिवसापूर्वीच शेतकऱ्यांचं कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. दरम्यान, शेतकरी दिवसाच्या दिनी लोकांनी आपल्या घरी दुपारचं जेवण तयार करू नये, असं आवाहन राकेश टिकैत यांनी देशवासीयांना केलं आहे. तर दुसरीकडे किसान एकता मोर्चाचं फेसबुक पेजही बंद झालं आहे. फेसबुकनं कम्युनिटी स्टँडर्डचा हवाला देत पेज बंद केलं आहे. यानंतर किसान एकता मोर्चानं ट्वीट करत जेव्हा लोकं आवाज उठवतात तेव्हा ते हेच करू शकतात असं म्हणत टीका केली.

कृषी कायद्याला विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांना आता शिवसेना हिंदचंही समर्थन मिळालं आहे. शिवसेना हिंदचे राष्ट्रीय अध्यक्ष निशांत शर्मा यांनी २१ डिसेंबर रोजी १२ राज्यांतील ६० जिल्ह्यांमध्ये कँडल मार्च काढणार असल्याची घोषणा केली आहे. तसंच केंद्र सरकारनं हे कायदे मागे घेतले नाहीत तर शिवसेना हिंदचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. पंजाब, हरयाणा, हिमाचल प्रदेश, दिल्ली, राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमधून कँडलमार्च काढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एककीडे नव्या कृषी कायद्यांना विरोध होत असला तरी दुसरीकडे काही शेतकऱ्यांकडून त्याला समर्थनही मिळत आहे. रविवारी पश्चिम उत्तर प्रदेशातील कृषी भवनात कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची काही शेतकऱ्यांनी भेट घेतली. तसंच आपण समर्थन करत असल्याचं पत्रही सादर केलं.